सैन्य पोटावर चालतं असं म्हणतात, ते काही खोटं नाही.मात्र पाकिस्तान सरकारची अपेक्षा अशी आहे की, सैन्यानं लढावं पण त्यांच्या हाती शस्त्रं नाही.लढायचं कसं हे तुमचं तुम्ही पहा असं म्हणत सरकारने हात वर केले, मग सैन्यानं बंड केलं तर ज्यांची एकीकडे समाजात सुपरहिरो म्हणून पुजा करायची त्यांना पोलीसांनी लाठय़ा मारल्या, तुरुंगात टाकले.आणि हे सारं कधी तर त्यांनी रणभूमीवर उभं राहणं, लढणं अपेक्षित असताना.पाकिस्तानच्या सैन्याची नाही ही गोष्ट आहे पाकिस्तानातल्या डॉक्टरांची.त्यातही बलूचिस्तानातल्या. बलूच म्हंटलं की पाकिस्तानात सरकारसह सैन्याच्याही भूवया उंचावतात. फुटीर असे शिक्के मारले जातात.आणि त्याच बलुचिस्तानात क्वेट्टा शहरातली ही गोष्ट. क्वेट्टाच्या सरकारी दवाखान्यात काम करणा:या तरुण डॉक्टरांनी धरणो दिले की, आम्हाला पीपीई द्या, एन -95 मास्क द्या. त्याचं कारण असं की काहीच साधनं नसल्याने 13 डॉक्टर तिथं कोरोना बाधीत झालेत.म्हणून हे तरुण डॉक्टर साधनांची मागणी करू लागले. ती कोणाच्याच कानी पोहोचली नाही म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्याना भेटायला सचिवालयाच्या दिशेनं मोर्चा काढला. अंतर अगदी जवळचं. तर त्यांच्यावर पोलीसांनी लाठी चार्ज केला. 13 डॉक्टरांना अटक करुन गुरांसारखं गाडीत बसवून नेण्यात आलं.यंग डॉक्टर्स असोसिएन म्हणून या तरुण डॉक्टरांची जी संघटना आहे, तिचे अध्यक्ष झाकीर अयानझाई म्हणतात, आम्हाला कळतं की, देश संकटात आहे. आमची गरज आहे. काम थांबवणं चूक आहे. मात्र आम्ही काय मोठंसं मागतोय, किमान आमच्या सुरक्षिततेची तर काळजी घ्या. आमचं म्हणणं काय हे तर ऐकून घ्या. काम करा, तोंड उघडायचं नाही हा कुठला न्याय? केवळ मागणी करता म्हणून तुम्ही जर लाठीचार्ज करणार असाल तर मग आम्ही पण काम नाही करणार, आता काम बंद!’
मुख्यमंत्र्यांनी आता या तरुण डॉक्टरांची समजून घालून त्यांना कामावर रुजू व्हायला भाग पाडलं. आपण लाठीचार्ज केला याचा पोलिसांनी इन्कारही केला, झाल्या प्रकरणी खेद व्यक्त केला. मात्र त्यांना हवी ती साधनं अजून देण्यात आलेली नाही.दुसरीकडे देशात यावरुन मोठं राजकारण पेटलं, सिंधी-पंजाबी नेते, इमरान खान विरोधक सगळ्यांनी निषेध करत या प्रकरणाला राजकीय रंग दिला. प्रकरण तापलं, डॉक्टरांना साधनं मात्र मिळालेली नाहीत.एकीकडे डॉक्टरांना सुपरहिरो म्हणायचं, त्यांच्यावर सोशल मीडीयात भावूक लेख लिहायचे, वास्तव मात्र हे, समाजाचा हा चेहरा भयाण आहे हे नक्की!