इस्लामाबाद – भारताला प्रवास निर्बंधांच्या यादीतून सूट मिळाल्यानंतर पाकिस्तानची तडफड सुरू झाली आहे. पाकिस्तानच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ब्रिटनच्या आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून लंडनद्वारे कोविड १९ प्रवासी संबंधात लावण्यात आलेल्या निर्बंधात बदल करण्यावरून आक्षेप घेतला आहे. ब्रिटननं भारताला रेड लिस्टमधून काढून एम्बर लिस्टमध्ये टाकलं आहे तर पाकिस्तानला अद्यापही रेड लिस्टमध्ये ठेवल्यानं ब्रिटीश सरकारचं धोरण पक्षपाती असल्याचा आरोप पाकिस्ताननं केला आहे.
एप्रिलच्या सुरुवातीला पाकिस्तानला तर १९ एप्रिलदरम्यान भारताला ब्रिटननं रेड लिस्टमध्ये टाकलं होतं. परंतु अलीकडेच भारतासह काही देशांना रेड लिस्टमधून बाहेर काढलं आहे. ५ ऑगस्टला भारताला एम्बर यादीत टाकलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गोंधळ झाला. ब्रिटनचे परिवहन मंत्री ग्रांट शाप्स यांनी ट्विट केलं की, यूएई, कतार, भारत, बहरिन या देशांना रेड लिस्टमधून वगळण्यात येत आहे. हे देश एम्बर लिस्टमध्ये असतील. हे बदल ८ ऑगस्टच्या सकाळी ४ वाजल्यापासून अंमलात येतील असं म्हटलं होतं.
देशाच्या कायद्यानुसार, एम्बर लिस्टमध्ये असलेल्या देशातील प्रवाशांना प्रवासाच्या ३ दिवसापूर्वी कोरोना लसीची चाचणी करावी लागेल. ब्रिटनमधून जाण्याआधी कोविड १९ च्या दोन चाचण्याची बुकींग करावी. त्याठिकाणी पोहचल्यानंतर पेसेंजर लोकेटर फॉर्म भरावा लागेल. तो प्रवासी १० दिवस घरात किंवा विलगीकरणात राहील. ब्रिटनचे आरोग्य मंत्री साजिद जाविद यांना लिहिलेल्या पत्रात पाकच्या कोरोना आकडेवारीची तुलना शेजारील अन्य देशांसोबत केली आहे.
पाकनं पत्रात म्हटलंय की, संक्रमित लोकांना प्रवास करण्यापासून रोखण्यासाठी तीन पर्यायांचा वापर केला पाहिजे. त्यात जागतिक आरोग्य संघटनेद्वारे कोविड १९ लसीकरण झालेले वैध प्रमाणपत्र, प्रवास करण्याच्या ७२ तासांआधीची आरटीपीसीआर चाचणी आणि हवाई विमानतळाहून उड्डाण करण्यापूर्वी रॅपिड अँटिजेन चाचणीचा समावेश असावा. पाकिस्तानच्या आकडेवारीची तुलना भारत, इराण आणि ईराकशी केली आहे. पाकिस्तानच्या दर १० लाख लोकांमध्ये मृत्यूदर खूप कमी आहे. दिवसाला सरासरी १०० पेक्षा अधिक लोकांचे लसीकरण होते. त्यामुळे ब्रिटननं त्यांच्या निर्णयात बदल करण्याची गरज आहे असं त्यांनी पत्रात सांगितले आहे.