इस्लामाबाद : कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रकारची देशांतर्गत विमान वाहतूक २६ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय पाकिस्तान सरकारने घेतला आहे. पाकिस्तानच्या नागरी उड्डयन प्राधिकरणाने ही माहिती दिली आहे.यासंदर्भातील अधिसूचना जारी करण्यात आली आहे, असे वृत्त पाकिस्तानातील सामा टीव्हीने दिले आहे. अधिसूचनेत म्हटले आहे की, देशांतर्गत शेड्युल्ड आणि नॉन-शेड्युल्ड, खासगी आणि प्रवासी विमान वाहतूक गुरुवारपासून बंद करण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, पाकिस्तान सरकारने विदेशी विमान वाहतूक बंद करण्याचा निर्णय याआधीच घेतला आहे. २२ मार्चपासून विदेशी विमानांना पाकिस्तानात उतरण्यास बंदी घालण्यात आली असून, ४ एप्रिलपर्यंत ती कायम राहणार आहे. पाकिस्तानात ९५९ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, नऊ जण मृत्युमुखी पडले आहेत. पाकिस्तानातील सिंध प्रांतात सर्वाधिक ४१० रुग्ण आहेत. पंजाबात २६७ आणि बलुचिस्तानात ११० जणांना बाधा झालेली आहे, असे सूत्रांनी सांगितले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याआधी देशव्यापी लॉकडाउन करणार नसल्याचे म्हटले होते, तसेच लोकांनी स्वत:च एकांतवासात राहावे, असे आवाहन केले होते. तथापि, कोरोनाचा वाढता प्रसार पाहून हा निर्णय त्यांना फिरवावा लागला आहे. लॉकडाउनला विरोध करताना इम्रान खान यांनी म्हटले होते की, देशव्यापी संचारबंदीचे पाकिस्तानी अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतील. विशेषत: गरिबांवर परिणाम होतील. पाकिस्तानातील २५ टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली जगते. देशव्यापी लॉकडाउन केल्याने माझे रोजंदारी कामगार, रस्त्यांवरील फेरीवाले आणि छोटे दुकानदार यांना घरातच बंदिस्त व्हावे लागेल. ते कसे काय कमावतील?.........................
Coronavirus : पाकिस्तानातील देशांतर्गत विमान वाहतूक उद्यापासून बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 1:36 AM