इस्लामाबाद - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग चिंतीत आहे. काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी काही देशांमध्ये मात्र कोरोनाचा फैलाव वाढत आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्येही कोरोनामुळे बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे, आता पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मोहम्मद कुरेशी यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. स्वत: कुरेशी यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.
आपल्या ट्विटमध्ये कुरेशी म्हणाले की, दुपारी मला सौम्य ताप आल्यासारखे वाटले. त्यामुळे मी स्वत:ला घरीच क्वारेंटाइन करून घेतले आहे. माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मात्र अल्लाच्या कृपेने माझ्या शरीरात मजबुती आणि तंदुरुस्ती आहे. मी घरातूनच माझे काम पाहणार आहे. कृपया माझ्यासाठी प्रार्थना करा.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होत असून, देशात दररोज कोरोनाचे हजारो रुग्ण सापडत आहेत. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २.२० लाख रुग्ण सापडले असून, ४ हजार ५०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.