वाशिंग्टन : कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जगभरात आतापर्यंत ८८ हजारहून अधिक लोकांचा मृत्य झाल्याचे समोर आले आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत जवळपास दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. इटली, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये मृतांचा आकडा सतत वाढताना दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत फ्रान्समध्ये १४१७ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते.
अमेरिकेत जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे जवळपास १९७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी १९३९ लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये जास्तकरून न्यूयॉर्कमधील नागरिकांचा समावेश आहे.
याचबरोबर, जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत १५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८८ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जवळपास ५० हजारहून जास्त लोकांचा मृत्यू युरोपीयन देशांमध्ये झाला आहे. फ्रान्समध्येही कोरोनामुळे मृतांच्या आकडा दहा हजार पार केला आहे.
भारतात सुद्धा कोरोनोमुळे चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५ हजार ९१७ वर पोहोचली आहे. तर २००हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात कोरोनाचे ५१२ नवे रुग्ण आढळले.