नवी दिल्ली : महासत्ता म्हणून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनने कोरोना विषाणूची साथ मुद्दाम जगभर पसरवून अखिल मानवजातीविरुद्ध घोर अपराध केल्याचा आरोप ‘इंटरनॅशनल कौन्सिल आॅफ ज्युरिस्टस्’ने (आयसीजे) केला असून, या प्रमादाबद्दल चीनला अद्दल घडेल, असा जबर दंड ठोठवावा, अशी मागणी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेकडे केली आहे.
‘आयसीजे’चे अध्यक्ष आदिश सी. अगरवाला म्हणाले की, चीन सरकारने कोरोनाला वेळीच आवर न घातल्याने संपूर्ण जग मंदीच्या खाईत लोटले जाऊन अब्जावधी डॉलरचे नुकसान झाले आहे व भारतासह अनेक देशांत लाखो लोकांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. या विषाणूचा प्रसार चीनमध्ये वुहान प्रांत सोडून अन्यत्र झाला नाही; पण जगात इतरत्र कसा झाला हे मोठे कोडे आहे.
या साथीच्या प्रसाराबद्दल, त्याने झालेल्या ६० हजारांहून अधिक मृत्यूंबद्दल व संपूर्ण जग ठप्प केल्याबद्दल जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार परिषदेने चीन सरकार, त्यांचे लष्कर व वुहान येथील प्रयोगशाळेला जबाबदार धरावे, अशी त्यांनी मागणी केली.
या साथीविषयी जाणीवपूर्वक चुकीची व अर्धवट माहिती देऊन चीनने जागतिक आरोग्य संघटनेची दिशाभूल केली. चीनचे हे वर्तन महामारीसंबंधीच्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या कराराचा भंग करणारे व तमाम जगातील लोकांच्या मानवाधिकारांचे घोर उल्लंघन करणारे आहे, असेही त्यांनी म्हटले.
महासत्ता बनण्यासाठी चीन सरकारने केलेले कटकारस्थानच्एका निवेदनात अगरवाला यांनी असा आरोप केला की, जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून जाहीर केलेली ही कोरोनाची साथ म्हणजे स्वत:ला महासत्ता म्हणून प्रस्थापित करण्यासाठी चीन सरकारने केलेले कारस्थान आहे.च्मात्र, हे करीत असताना जागतिक आरोग्य संघटना व अन्य जगाला सावध करण्यात कुचराई करून चीनने संपूर्ण जगावर हे जैविक युद्ध थोपविले आहे.