लिमा : संपूर्ण जगात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आल्याने बहुसंख्य लोक घरात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमध्ये कोरोनाचा सामना करण्यासाठी पेरू देशात दिल्ली सरकारप्रमाणे ऑड-ईव्हन फॉर्म्युला लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र पेरू देशात हा फॉर्म्युला वाहनांवर नव्हे तर येथील नागरिकांसाठी लागू केला आहे.
पेरूमध्ये कोरोना व्हायरसा प्रसार रोखण्यासाठी लिंग आधारित क्वॉरन्टाईनची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार एका दिवशी केवळ महिला घराबाहेर पडू शकणार आहे. तर दुसऱ्या दिवशी केवळ पुरुषांना घराबाहेर निघता येणार आहे. हा नियम शुक्रवारपासून लागू करण्यात आला आहे. पेरूचे राष्ट्रपती मार्टीन विजकारा यांनी या नियमाची घोषणा केली आहे. पेरूमध्ये आतापर्यंत १४१४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. तर ५५ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
काय आहे नियम ?
पेरूमध्ये लागू केलेल्या नियमानुसार सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी केवळ पुरुषांना घराबाहेर जाता येणार आहे. तर मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी केवळ महिलांना बाहेर जाता येणार आहे. लिंग आधारित क्वॉरन्टाईचा नियम १२ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. याआधी पनामा येथे देखील लिंग आधारित क्वॉरन्टाईनचा नियम लागू करण्यात आला होता.
घराबाहेर पडलेल्यांना याची जाणीव राहिल की, आपले आप्त घरी वाट पाहात आहे. त्यामुळे ते लवकर घरी परत येतील. हा नियम लागू करण्याचा हाच मुख्य उद्देश हा आहे. या नियमामुळे काही ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळाले. त्यामुळे पेरू येथे हा नियम लागू करण्यात आल्याचे राष्ट्रपती विजकारा यांनी सांगितले.