बीजिंग : जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील प्रयोगशाळेत करण्यात आली होती, असा दावा करणारे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईकपॉम्पेओ हे अविवेकी गृहस्थ आहेत, अशी टीका चीनमधील सरकारी प्रसारमाध्यमांनी केली आहे. चीननेच हा विषाणू बनविल्याचा अमेरिकेचा दावा जागतिक आरोग्य संघटनेने याआधीच फेटाळून लावला आहे.
चीनवरील आरोप सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेसमोर अद्याप सादर केलेला नाही, या गोष्टीकडेही चिनी सरकारी प्रसारमाध्यमांनी लक्ष वेधले आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पेओ यांना फक्त विष पसरवायचे व खोटा प्रचार करायचा आहे, असे प्रत्युत्तर चीनमधील सरकारी वृत्तवाहिनीने दिले आहे.
माईक पॉम्पेओ यांनी रविवारी म्हटले होते, की कोरोना विषाणूची निर्मिती चीनमधील प्रयोगशाळेत करण्यात आली, याचे ठोस पुरावे अमेरिकेच्या हाती लागले आहेत. चीनने ज्या पद्धतीने कोरोना साथीचा मुकाबला केला, त्या गोष्टी संशयास्पद आहेत, असेही ते म्हणाले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकेल रयान यांनी सांगितले, की या विषाणूची निर्मिती चीनच्या प्रयोगशाळेत झाल्याच्या आरोपाला बळकटी देणारे कोणतेही पुरावे अद्याप अमेरिकेने आम्हाला सादर केलेले नाहीत.अमेरिकी नेत्यांचा आरोप चुकीचा; कोलंबिया विद्यापीठाचा घरचा अहेरअमेरिकेकडून चीनवर असा गंभीर आरोप करण्यात आल्यानंतर याच देशातील महत्त्वपूर्ण विद्यापीठांपैकी एक कोलंबिया विद्यापीठाने आपल्या नेत्यांना घरचा अहेर दिला आहे. कोरोना विषाणूचे निसर्गात पहिल्यापासून अस्तित्व होते, असे या विद्यापीठातील विषाणुतज्ज्ञ आयएन लिपकिन यांनीही नमूद केले आहे. ते म्हणाले, की कोरोनाचा विषाणू चीनने निर्माण केला, असा अमेरिकी राजकीय नेते करीत असलेला आरोप चुकीचा आहे. त्याला कोणताही आधार नाही.