नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसचं संकट संपूर्ण जगावर पसरलं आहे. जगातील २० लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १ लाख २० हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे लोकांच्या जीवाला धोका आहेच पण त्यापेक्षा जास्त धोका सोशल मीडियात पसरणाऱ्या अफवांनी होऊ शकतो अशी भीती संयुक्त राष्ट्रांनी व्यक्त केली आहे.
दिशाभूल करणारी माहिती सोशल मीडियावरून पसरल्यामुळे इराणमध्ये १ हजारांपेक्षा जास्त लोकांनी औद्योगिक अल्कोहोल प्राशन केले. त्यामुळे ६०० लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्राने जगातील सर्व देशांना इशारा दिला आहे की, कोरोनाशी संबंधित फेक न्यूज रोखा अन्यथा त्यामुळे अनेकांचा जीव जाईल असं संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुतारेस यांनी सांगितले आहे.
गुतारेस म्हणाले की, संपूर्ण जग ज्यावेळी कोविड -१९ या साथीच्या आजाराशी लढत असताना व्हॉट्सअॅपसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोविड -१९ बद्दल चुकीची माहिती पसरल्यामुळे आपल्याला आणखी एक धोकादायक संकटाचा सामना करावा लागला आहे. अनेक लोकांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या चुकीच्या माहितीच्या विषाणूचा सामना करण्यासाठी इंटरनेटवर तथ्य आणि विज्ञानावर आधारित गोष्टी ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटना पुढाकार घेईल असं त्यांनी घोषित केले.
चुकीची माहिती करते विषाचं काम
मंगळवारी एका संदेशात, संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सरचिटणीस यांनी कोरोना विषाणूबद्दल जगभरात दिल्या जाणाऱ्या खोटी माहिती आणि चुकीच्या आरोग्याचा सल्ला याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. जगातील देश कोविड -१९ साथीच्या संकटाशी लढत आहे, जे दुसर्या महायुद्धानंतरचे सर्वात कठीण आव्हान आहे. त्याच वेळी, आपल्याला चुकीची माहिती पसरविण्याचा आणखी एक धोकादायक महामारीचा सामना करावा लागला आहे असं गुतारेस म्हणाले.
दरम्यान, मोठ्या प्रमाणात चुकीची माहिती पसरत आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीला षडयंत्र असल्याचा दावा करणारी अफवा पसरवली जात आहे. समाजात तेढ निर्माण होईल असे मॅसेज व्हायरल केले जात आहे. जगातील सर्व देशांना या संकटात एकजुटीने एकत्र येऊन सामना करायला हवा. सर्व देशांनी कोणतीही चुकीची माहिती अथवा अफवा पसरवू नका अशी जनजागृती करायला हवी. चुकीच्या माहितीचं खंडन करण्यासाठी तात्परता दाखवली पाहिजे असंही संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे.