मॉस्को: जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असून, इटली, स्पेन आणि अमेरिकेला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. रशियामध्येही कोरोना संक्रमितांची संख्या दिवसागणिक वाढत असून, आता तिथल्या पंतप्रधानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशस्टीनदेखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. आता त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती एएफपी या वृत्तसंस्थेनं दिली आहे. रशियामध्ये गुरुवारपर्यंत कोरोनामुळे बाधित झालेल्या लोकांची संख्या १००,०००च्या पार गेली आहे. मृतांचा आकडासुद्धा १०००च्या आसपास आहे. तत्पूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. यंदा जानेवारीत रशियाच्या पंतप्रधानपदासाठी निवड झालेल्या मिखाईल यांची कोरोना चाचणी झाली होती, जी गुरुवारी पॉझिटिव्ह आली आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत दूरचित्रवाणीवरील प्रसारित व्हिडीओच्या माध्यमातून मिखाईल यांनी ही माहिती दिली आहे. ते सध्या पंतप्रधानपदावरून पायउतार होत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यांनी आंद्रे बेलूसोव यांना हंगामी पंतप्रधान बनविण्याचा सल्लाही दिला असून, तो पुतिन यांनी मान्य केला आहे. मिखाईल आता कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होणार आहेत.
CoronaVirus: ब्रिटननंतर आता रशियाच्या पंतप्रधानांना कोरोनाची लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 12:44 AM