ऑस्टिन : अमेरिकेत कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच असून, एका दिवसात तब्बल ४० हजार नवे रुग्ण आढळल्याने तेथील दोन प्रांतांमध्ये काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. टेक्सासच्या गव्हर्नरनी सर्व बार बंद करण्याचे आदेश दिले आहेत, तर फ्लोरिडामधील रेस्टॉरंट व बारमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली आहे.
रेस्टॉरंट व बारमध्ये अनेक तरुण गर्दी करीत असून, ते मास्क अजिबात वापरत नाहीत आणि फिजिकल डिस्टन्सिंगचेही पालन करीत नाहीत, असे दिसून आले आहे. तरुणांमध्येच कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक असून, त्याची हीच कारणे असावीत, असे जाणवल्याने टेक्सासमध्ये बार बंद करण्याचा आणि फ्लोरिडामध्ये मद्यविक्री थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला, असे तेथील प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी सांगितले की, रेस्टॉरंटची क्षमता कमी करण्याचे ठरविले आहे. तसेच १०० हून अधिक लोक उपस्थित राहणार असतील, अशा समारंभाला यापुढे प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल. काय समारंभ आहे, कोण लोक येणार, त्यात वृद्ध, महिला, लहान मुले किती असतील, त्यांना कोणते आजार होते वा आहेत का आणि अशा मंडळींनी समारंभास उपस्थित राहण्याची गरज आहे का, हे तपासले जाईल. तसेच समारंभाचे ठिकाण आणि समारंभात होणारे कार्यक्रम यांची माहितीही संबंधितांना आधी द्यावी लागेल.फ्लोरिडाच्या मियामी दादे कौंटीचे मेयर कार्लस जिमेनिझ म्हणाले, आम्ही समुद्रकिनारे काही काळ बंद ठेवण्याचे ठरविले आहे. तरुणांमध्येच कोरोनाची अधिक लागण होत असल्याचे दिसून आल्यामुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यावर निर्बंध आणले आहेत.परिस्थितीत सुधारणाविविध प्रांतांत काही निर्बंध लागू करण्यात येत आहेत, तर काही ठिकाणी ते शिथिल केले जात आहेत. अमेरिकेचे उपाध्यक्ष माइक पेन्स यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, दोन महिन्यांपूर्वी जी परिस्थिती देशात होती, त्यात आता खूपच सुधारणा झाली आहे. रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. अमेरिकेच्या मृत्युदरातही घट झाली आहे.