गेल्या २ वर्षापासून कोरोना महामारीनं जगासमोर संकट उभं केले आहे. या महामारीमुळे लाखो लोकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र लसीकरणामुळे आता कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येत आहे. त्यात कोरोनाविरुद्ध लढाईत रशियानं मोठं यश मिळवलं आहे. रशियन व्हॅक्सिन स्पुतनिकचं नेजल व्हर्जन समोर आले आहे. जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन रशियानं उत्पादित केली आहे. ही स्पुतनिक व्हॅक्सिन नव्या रुपात आली आहे.
या नेजल व्हॅक्सिनची चाचणी रशियाकडून बराच काळ सुरू होती. इतर काही देशही या दिशेने काम करत होते, पण यश मिळवणारा पहिला देश आता रशिया बनला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नेजल व्हॅक्सिन आल्यानंतर कोरोनाविरुद्ध सुरू असलेले हे जागतिक युद्ध सोपे होऊ शकते. ही लस नाकातून दिली जाते. याला इंट्रानेजल लस असेही म्हणतात. इंजेक्शनद्वारे दिलेली लस ही इंट्रामस्क्युलर लस आहे. ही नेजल व्हॅक्सिन स्प्रे म्हणून दिली जाऊ शकते असं सांगितलं जात आहे.
दरम्यान, भारतही कोरोना विरूद्ध नेजल लस तयार करत आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा याचा उल्लेख केला आहे. ही लस भारत बायोटेकने वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिन (WUSM) च्या सहकार्याने विकसित केली आहे. इंजेक्टेड लसीपेक्षा याचे अधिक फायदे मानले जात आहेत. या लसीमुळे लोकांवर कमी दुष्परिणाम होतील आणि त्यामुळे इंजेक्शन सुईचा अपव्ययही कमी होईल, असेही तज्ज्ञ सांगत आहेत.
कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नवी आकडेवारी समोर
गेल्या २ वर्षापासून जगात कोरोना महामारीमुळे अनेक देशांत चिंतेचे वातावरण पसरलं होतं. त्यात आता जागतिक आरोग्य संघटनेने(WHO) कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी जारी केली आहे. २१ मार्च ते २७ मार्च काळात कोरोना रुग्णांचे प्रमाण १४ टक्क्यांनी कमी झाले आहे. परंतु मृतांचा आकडा ४३ टक्क्यांनी वाढला आहे. मात्र त्यामागचं कारण वेगळं आहे. भारतात झालेल्या मृतांचा आकडा आता अपडेट केल्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढले आहे.