सिंगापूरः कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगात हातपाय पसरले आहेत. अनेक देशांना या व्हायसरची भीती सतावते आहे. बऱ्याच देशांनी कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन केलं आहे. विशेष म्हणजे सिंगापूरनं कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नियमच बदलले आहेत. सिंगापूरनं कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर एक नवीन नियम अंमलात आणला आहे. त्या नियमानुसार आपण एकमेकांच्या जवळ बसल्यास ६ महिने कैद आणि ५ लाख २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. कोरोना व्हायरसनं जगाला विळख्यात घेतलं आहे. अद्यापही त्यावर कोणतंही औषध किंवा लस सापडलेली नाही. कोरोना प्रभाव कमी करण्यासाठी अनेक देश वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. अशाच प्रकारे सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं नवीन नियम जारी केला आहे. २७ मार्चला आरोग्य मंत्रालयानं एक सर्क्युलर जारी केलं आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून बसण्याची सूचना करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या ऐवजी हा उपाय योजल्यास फायदेशीर ठरू शकतो. तसेच त्याचा अर्थव्यवस्थेवरही कोणताही प्रभाव पडणार नाही. त्यामुळे आता शाळा-कॉलेज, हॉटेल आणि कार्यालयात दोन लोकांमध्ये १ मीटरचं अंतर असणं आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती स्वतःची जागा सोडून दुसऱ्या व्यक्तीला भेटायला जात असेल आणि त्या दोघांमध्ये १ मीटरचं अंतर नसल्यास संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच त्या व्यक्तीला ६ महिने तुरुंगवास आणि ५ लाख २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. हा नियम ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. सिंगापूर सरकारनं नाइट क्लबही बॅन केले आहेत. तसेच एका वेळी १० जण एकत्र येणार नाही, असे नियमही बनवले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण २३ जानेवारीला समोर आलं. आतापर्यंत इथे ७३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. इतर देशांच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे. त्यामुळे सिंगापूरच्या सरकारनं आतापासूनच सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंगापूरमध्ये कोरोना दुसऱ्या टप्प्यात आहे. फक्त गुरुवारी ५२ कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडले आहेत. यातील २८ जण विदेश प्रवास करून आले आहेत. इतर देशांत जवळ उभं राहणं आणि जाणूनबुजून खोकल्यास किंवा शिंकल्यास गुन्हे नोंदवले जात आहेत.
Coronavirus: आता जवळ बसलात तरी ६ महिने तुरुंगवास अन् लाखोंचा दंड होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:46 PM