बीजिंग:चीनमध्ये कोरोनामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. अंत्यसंस्कारासाठीचा प्रतीक्षा कालावधी मोठा असल्याने बीजिंगमधील गोदामांमध्ये मृतदेह ठेवण्यात येत आहेत. चक्क डुकरांसाठीच्या गोदामाचाही यासाठी वापर करण्यात येत आहे. दरम्यान, आजपासून कोरोना रुग्णांची माहिती देणार नाही, असे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले.
चीनमधील कम्युनिस्ट पक्षावर लक्ष ठेवणाऱ्या मानवाधिकार कार्यकर्त्या जेनिफर झेंग यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात कोरोनामुळे मरण पावलेल्या लोकांचे मृतदेह दिसत आहेत. हा व्हिडीओ एका मशिदीचा आहे. अंत्यसंस्कारासाठीचा प्रतीक्षा कालावधी मोठा असल्याने बीजिंगमधील गोदामांमध्ये मृतदेह ठेवण्यात येत आहेत. चक्क डुकरांसाठीच्या गोदामाचाही यासाठी वापर करण्यात येत आहे.
जिनपिंग यांच्या आईचा मृत्यू?
राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे झेंग यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे. मात्र, ही अफवा असून याला दुजोरा मिळालेला नाही.
१५,००० मृतदेह गोदामांमध्ये
युक्वानिंग उपजिल्हा येथील एका गोदामात १५ हजार मृतदेह ठेवण्यात आले आहेत, असेही झेंग यांनी सांगितले. ऑक्सिजनची कमतरता हीदेखील चीनमधील एक मोठी समस्या आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढत असल्याचे सांगण्यात येते. हा आकडा दहा लाखांवर जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, येथे रक्ताचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक असल्याने...
चीनच्या लसीची गुणवत्ताही चांगली नाही. लसीकरणाचे प्रमाणही कमी आहे. तिथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे मृत्यूची शक्यता अधिक आहे. त्या तुलनेत आपल्या देशात ६५ वर्षांवरील लोकांची संख्या ६ टक्के आहे. आज चीनमध्ये जी परिस्थिती आहे, त्यामुळे जगात संकट निर्माण होईल, असे मला वाटत नाही, असे आयसीएमआरचे माजी प्रमुख रमण गंगाखेडकर यांनी दिला आहे.
जपान : २४ तासांत १.७७ लाख नवे रुग्ण
जपान टाइम्सच्या वृत्तानुसार देशात ८ वी लाट आली आहे. कोरोना वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ७७ हजार नवीन रुग्ण आढळले आहेत. तेथे ३३९ लोकांचा मृत्यू झाला आहे.
फ्रान्स, द. कोरिया : नवे रुग्ण लाखावर
दक्षिण कोरिया आणि फ्रान्समध्ये गेल्या २४ तासांत एकूण १ लाख ६ हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत. दक्षिण कोरियात नवीन रुग्णांची संख्या ६६ हजार ४९, तर फ्रान्समध्ये ही संख्या ४० हजार ७४४ आहे. दक्षिण कोरियात ७० जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत एक्सबीबीचे रुग्ण १८.३ टक्के
चीनमधील बीएफ.७ प्रमाणेच अमेरिकेत एक्सबीबीची प्रकरणे वाढत आहेत. हा देखील ओमायक्रॉनचा उपप्रकार आहे. अमेरिकन सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशननुसार, या आठवड्यात देशात नोंदवलेल्या प्रकरणांपैकी १८.३% प्रकरणे एक्सबीबी प्रकारातील आहेत. गेल्या आठवड्यात आकडा ११.२% होता. सिंगापूरमध्येही या प्रकाराची प्रकरणे आढळून येत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"