न्यूयॉर्क - अमेरिका आणि युरोपमध्ये कोरोना विषाणूने गंभीर रूप धारण केले आहे. एकीकडे कोरोना विषाणूची सुरुवात झालेल्या चीनमध्ये आता जनजीवन सुरळीत होत असताना अमेरिका आणि युरोपमध्ये मात्र कोरोनाचा फैलाव वेगाने सुरू आहे. जगभरातील कोरोनाबधितांची संख्या 7 लाखावर तर मृतांचा आकडा 34 हजारांवर पोहोचला आहे.
अमेरिकेत काल एका दिवसात 18 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. तर आतापर्यंत अमेरिकेत 2475 जणांचा मृत्यू झाला आहे. काल एका दिवसात अमेरिकेत 255 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनामुळे अधिक गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. इटलीत मृतांचा आकडा 10 हजार 700 हुन अधिक झाला आहे. इटलीतील लोंबार्डी प्रांतात 6 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 821 जणांनी कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. स्पेनमधील मृतांचा आकडा सहा हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे.
इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, नेदरलँड, स्वित्झर्लंड, बेल्जियम या यूरोपीय देशांमध्येही कोरोनाची धोकादायक पातळी ओलांडली आहे. तर इराणमध्ये कोरोनाग्रस्थांचा आकडा 38 हाजारांवर पोहोचला आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाचे दीड हजार रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, अमेरिकेत कोरोनावर उपचार करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. ह्यूस्टनच्या एका मोठ्या रुग्णालयात कोविड -१९ पासून बरे झालेल्या रुग्णाचे रक्त या आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाला चढविण्यात आले आहे. प्राणघातक कोरोना विषाणूंपासून बरा झाल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चांगल्या स्थितीत राहिलेल्या व्यक्तीने रक्ताचा प्लाझ्मा दान केला आहे. हा प्लाझ्मा ह्युस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलमधील 'कॉन्व्लेसेन्ट सीरम थेरपी' साठी दिला आहे. उपचाराची ही पद्धत 'स्पॅनिश फ्लू' साथीच्या आजारावेळी वापरण्यात आली होती