वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना महामारीने घेतलेले बळी (४०,५८५) व संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या (७.४२ लाख) जगातील अन्य कोणत्याही देशाहून कितीतरी अधिक असली तरी अमेरिकेने या साथीला नियंत्रित करण्याचे काम फारच उत्तम प्रकारे केले आहे, असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने वेळीच कडक उपाय योजले नसते तर लाखो नागरिक या साथीला बळी पडले असते. हे उपाय योजूनही किमान एक लाख मृत्यू होतील असा अंदाज व्यक्त केला गेला होता. आत्ताचा रोख पाहता मृतांचा आकडा फार तर ६० हजारांपर्यंत जाईल, असे दिसते. म्हणजेच संभाव्य मृत्यूंची संख्या ४० हजारांनी कमी होत आहे. नक्कीच हे फार मोठे यश आहे.अमेरिकेत आत्तापर्यंत ४१ लाख नागरिकांची कोरोना चाचणी केली गेली आहे, असे सांगून ट्रम्प यांनी असाही दावा केला की, अमेरिकेतील चाचण्यांचा हा आकडा फ्रान्स, ब्रिटन, दक्षिण कोरिया, जपान, सिंगापूर, भारत, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, स्वीडन व कॅनडा या १० देशांमध्ये मिळून केल्या गेलेल्या चाचण्यांहून अधिक आहे. एक प्रकारे हा जागतिक विकम आहे. ट्रम्प म्हणाले की, सुरक्षित राहणे हा आमच्या धोरणाचा मुख्य भाग आहे. आम्ही काहीही बंद केलेले नाही व करणारही नाही. तरीही आम्ही हे काम पद्धतशीरपणे करत आहोत. (वृत्तसंस्था)
CoronaVirus: अमेरिकेचे नियंत्रण उत्तम; ट्रम्प यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 1:02 AM