न्यूयॉर्क – संयुक्त राज्य अमेरिकेत(US) पुन्हा एकदा कोरोना संसर्गात वाढ झाल्याचं समोर आले आहे. मागील काही दिवसांपासून सातत्याने याठिकाणी रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अमेरिकेतील एक तृतीयांश लोक अशा ठिकाणी राहत आहेत जिथे कोविड १९ चा धोका इतका वाढला आहे ज्यामुळे कदाचित लोकांना बंद खोलीतही मास्क घालण्याचा विचार करावा लागेल असं अमेरिकेच्या फेडरल आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कोरोनाच्या नव्या आकडेवारीत मागील आठवड्याच्या तुलनेत लक्षनीय वाढ झाल्यानं प्रशासनाची चिंता वाढली आहे.
कोरोना रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राचे संचालक डॉ. रोशेल पी वॅलेन्स्की म्हणाले की, मागील काही आठवड्यांच्या तुलनेने गेल्या ७ दिवसांत १९ टक्क्यांनी रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. दरदिवशी सरासरी ३ हजार लोक कोविड उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत आहेत. ३२ टक्क्यांहून जास्त अमेरिकन नागरिक अशा भागात राहत आहेत ज्याठिकाणी कोरोना संसर्गानं उच्च पातळी गाठली आहे. त्यामुळे तेथील स्थानिक नेत्यांनी, लोकांनी प्रतिबंधात्मक उपाय अवलंबले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी फिरताना तसेच बंद खोलीतही मास्क घालण्याचा विचार व्हावा तसेच चाचणी वाढवली पाहिजे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत न्यूयॉर्क शहरात कोविड पातळी उच्चस्तरावर पोहचली आहे. ज्याचा अर्थ आता लोकांना एकमेकांपासून हा संसर्ग पसरवण्यापासून रोखलं पाहिजे. न्यूयॉर्कमधील लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं, गर्दी न करणे आणि कोरोना पसरवणाऱ्या ठिकाणी जाणे टाळावे असा सल्ला देण्यात येत आहे. डॉ. वॅलेन्स्की आणि फेडरल आरोग्य अधिकाऱ्यांचा इशारा आणि राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांच्या भूमिकेत विसंगती वाटते. वेस्ट विंगमधील अनेक अमेरिकन लोकांनी मास्क परिधान करणं आणि इतर नियमांचे पालन करणं बहुतांश सोडलं आहे.
बायडनदेखील अनेक कार्यक्रमात विनामास्क वावरतात. मात्र व्हाईट हाऊस पूर्ण काळजी घेत आहे. राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वांची नियमित चाचणी घेतली जाते. बायडन सीडीसीच्या नियमांचे पालन करतात असं त्यांचे सहाय्यक सांगतात. परंतु राष्ट्राध्यक्ष कोविड महामारीला प्रमुख चिंता मानत नाहीत. व्हाईट हाऊसमध्ये बुधवारी सहा आठवड्यानंतर पहिल्यांदा कोविड परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यात कोविडऐवजी बायडन यांनी रशिया-यूक्रेन युद्ध आणि महागाई यावर बरीच चर्चा केली. बुधवारी बायडन यांच्या संपर्कातील काहींना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आले. त्यात आरोग्य विभागाचे अधिकारी, बायडन यांच्या मुलीचाही समावेश आहे.