वॉशिंग्टन : कोविड-१९च्या आजाराशी तब्बल ६२ दिवस झुंज दिल्यावर पूर्ण बरे होऊन घरी गेलेल्या एका ७० वर्षांच्या रुग्णास सिएटलमधील एका इस्पितळाने तब्बल १.१ दशलक्ष डॉलरचे (सुमारे ८.१४ कोटी रुपये) बिल लावले आहे.‘सिएटल टाइम्स’ वृत्तपत्राने शनिवारी दिलेल्या वृत्तानुसार, मायकेल फ्लॉॅर नावाच्या या कोरानाबाधित वृद्धास ४ मार्च रोजी सिएटलच्या स्वीडिश मेडिकल सेंटरमध्ये दाखल केले गेले होते. हॉस्पिटलचे हे गलेलठ्ठ बिल पाहिल्यावर क्षणभर मला माझे हृदय दुसऱ्यांदा बंद पडल्यासारखे वाटले, असे हा वृद्ध विनोदाने म्हणाला.या वृत्तानुसार फ्लॉर हे अमेरिकेच्या ‘मेडिकेअर’ या राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेचे लाभार्थी असल्याने या बिलापैकी बहुतांश रक्कम त्यांना स्वत:च्या खिशातून द्यावी लागणार नाही. तरीही फॉर म्हणाले की, सरकारी तिजोरीतून हा एवढा खर्च माझ्याऐवजी अन्य कोणाचा तरी जीव वाचविण्यासाठी झाला असता तर अधिक बरे झाले असते, असा विचार मनात येतो आणि बरे होऊन आपण गुन्हा केला, असे जाणवत राहते.फ्लॉर यांच्यावर उपचार केलेले वैद्यकीय कर्मचारी ‘चमत्कारी व्यक्ती’ म्हणतात. याचे कारणही तसेच आहे. कोरोनाविरुद्धच्या या प्रदीर्घ लढ्यात एक दिवस त्यांचे हृदय, फुप्फुसे व मूत्रपिंडे हे सर्व अवयव एकाच वेळी निकामी झाले तेव्हा त्यांचा आता काही भरवसा नाही, असे मानून इस्पितळाने त्यांच्या पत्नीस व मुलांना त्यांच्याशी एकदा शेवटचे बोलण्यासाठी मुद्दाम बोलावूनही घेतले होते. पण यमदूतांना वाकुल्या दाखवून फ्लॉर त्यातूनही बरे झाले. (वृत्तसंस्था)१८१ पानांचे बिलफ्लॉर यांना इस्पितळाने बिल १८१ छापील पानांचे आहे. त्यातील खर्चाच्या काही प्रमुख बाबी अशा:९,७३६ डॉलर : आयसीयू बेडचे प्रतिदिन शुल्क८२, १५ डॉलर : २९ दिवसांचा व्हेंटिलेटरचा खर्च१.०३ लाख डॉलर : अनेक अवयव निकामी झाल्यावर दोन दिवसांचे उपचार
CoronaVirus News: बापरे! कोरोना रुग्णाचं हॉस्पिटलचं बिल तब्बल ८ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 4:03 AM