जिनिव्हा : चुका करू नका, सावध राहा, कोरोना विषाणू एवढ्यात आपली पाठ सोडणार नाही; अजून खूप मोठी लढाई लढायची आहे, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस अधनॉम यांनी गुरुवारी सावधगिरीचा इशारा दिला. सध्याचा काळ एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा नसून, कोरोनाविरोधात एकजुटीने लढण्याचा आहे, असे त्यांनी नमूद केले.बाधितांचा जगभरातील आकडा २८ लाखांपार गेला असून, आतापर्यंत सुमारे २ लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येचा आलेख जगाच्या प्रत्येक भागात वेगवेगळा आहे. पश्चिम युरोपातील साथ हळूहळू स्थिरावत आहे किंंवा कमी होत आहे. तरीही, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका तसेच पूर्व युरोपातील स्थिती चिंंताजनक आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अजूनही काही देश कोरोनाच्या साथीच्या प्राथमिक अवस्थेत आहेत. ज्या देशांमध्ये सर्वप्रथम कोरोनाची साथ आली, तेथे नव्याने प्रादुर्भाव होऊ लागला आहे.घरीच थांबणे आणि फिजिकल डिस्टन्सिंंग यामुळे बऱ्याच देशांमधील साथ आटोक्यात येत आहे. मात्र, विषाणूचे घातक परिणाम कायम राहतील. प्रारंभीच्या निरीक्षणानुसार, जगातील बहुसंख्य लोकसंख्येला कोरोनाची लागण होऊ शकते. त्यामुळे हा रोग काही काळ कमी होऊन पुन्हा डोके वर काढू शकतो. अनेक देशांमधील नागरिक आता घरीच थांबण्याला विरोध करीत आहेत. दैनंदिन जीवन ठप्प झाल्यामुळे अनेकांना नैराश्य आले आहे. आयुष्य पूर्ववत व्हावे, असे त्यांना वाटत आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाही जनजीवन पूर्ववत व्हावे, असे वाटत आहे आणि त्याच दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. भविष्यातील जग हे निरोगी आणि अधिक सुरक्षित, सुसज्ज असावे, हाच संघटनेचा प्रयत्न आहे, अशी माहिती डॉ. टेड्रॉस यांनी दिली.>कोरोना साथीच्या काळात काय करावे लागेल?प्रत्येक रुग्ण शोधा, विलग करा.प्रत्येकाची तपासणी करा, प्रत्येकाची काळजी घ्या.रुग्णाच्या संपर्कात असलेल्या प्रत्येक व्यक्तिपर्यंत पोचा, त्यांना विलग करा.जे देश विलगीकरणाचे, चाचण्यांचे नियम पाळणार नाहीत, त्यांना भविष्यात अधिक मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल.जागतिक आरोग्य संघटना प्रत्येक देशाला मदत करायला तयार आहे. या काळात मानसिक स्वास्थ्य जपणेही खूप गरजेचे आहे.
CoronaVirus : ...अजून मोठी लढाई लढायची आहे, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 2:37 AM