नवी दिल्ली : आतापर्यंत जगभरात कोरोनाबाधितांची आकडेवारी ४३ लाखांपेक्षा अधिक असून २ लाख ९० हजारांहून अधिक बळी गेले आहेत. तसेच तब्बल १८५ देशामध्ये हा संसर्ग पसरला असून १० लाखांहून अधिक लोक यातून बरेही झाले आहेत, असे जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने जमविलेल्या माहितीतून समोर आले आहे.डिसेंबर २०१९ मध्ये ही लागण चीनच्या वुहान प्रांतापुरती मर्यादित होती. नंतर काही दिवसातच हा विषाणू अनेक देशांमध्ये पसरला. परंतु आजही असे काही देश आहेत जिथे या विषाणूचा संसर्ग पोहचलेला नाही. किरीबाती, मार्शल आयलँडस, मायक्रोनेशिया, नौरू, उत्तर कोरिया, पलाऊ, सामोआ, सोलोमन आयलँडस, टोंगा, तुर्कमेनिस्तान, तुवालु आणि वानुआतु असे एकूण १८ देश आजही कोरोनापासून मुक्त आहेत. परंतु आशिया खंडातील उत्तर कोरिया आणि तुर्कमेनिस्तान हे देश या यादीत असल्याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कारण दोन्ही देश भूभागाने वेढलेले आहेत. उत्तर कोरियाची सीमा तर चीन आणि रशियाला लागून आहे. परंतु तिथे किंम जोंग उन यांचा एककल्ली कारभार चालतो. त्यामुळे या देशातून खरी माहिती बाहेरच्या जगापर्यंत पोहचू दिली जात नाही, असे मानले जाते.तसेच तुर्कमेनिस्तान आशियामध्ये असून कझाकस्तान, उजबेगिस्तान, अफगाणिस्तान आणि इराणने वेढलेले आहे. याची लोकसंख्या केवळ 56 लाख इतकी आहे. इथेही निरंकुश शासन आहे आणि दडपशाहीमुळे मानवी हक्कांची पायमल्ली केली जाते. येथील आरोग्यव्यवस्थाही कमकुवत आहे. अशा स्थितीत या देशातूनही कोरोनाबाधितांबाबत नेमकी माहिती बाहेर दिली जात असेल, याबाबत शंका व्यक्त केली जाते. यातील काही देश बेटासारखे असल्याने तिथे कोरोना विषाणू पोहचू शकलेला नाही. त्यामुळे हे देश जगातील इतर देशांपासून दूर आहेत. त्यामुळेच ते या संसगार्पासून आतापर्यंत वाचू शकले आहेत. (वृत्तसंस्था)स्कॉटलंडचा निराळा पवित्राइंग्लंडमध्ये निर्बंध काही प्रमाणात शिथिल केले असले तरी स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड या भागांमध्ये लोकांनी महत्त्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये हे घातलेले बंधन अद्यापही कायम आहे. स्कॉटलंडच्या मंत्री निकोला स्टर्जन यांनी सांगितले की, लोकांनी आपापल्या कार्यालयात जाऊन कामावर रुजू व्हावे यासाठी इंग्लंडच्या पंतप्रधानांनी घाईघाईने आदेश काढला आहे. सार्वजनिक आरोग्यसुरक्षा लक्षात घेता हा आदेश स्कॉटलंडमध्ये सध्या तरी लागू करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
coronavirus: हे १८ देश अजूनही सुरक्षित, काहींच्या आकडेवारीबाबत मात्र संभ्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2020 6:20 AM