वॉशिंग्टन : शरीरामध्ये जंतुनाशक द्रव्ये (डिसइन्फेक्टन्ट) टोचून कोरोना विषाणू नष्ट करता येतील का किंवा त्याला मारण्यासाठी शरीराच्या आत अल्ट्रा व्हायोलेट (यूव्ही) किरणांद्वारे उपचार करता येतील का या गोष्टींचा अभ्यास करावा, तसे प्रयोग करावेत, अशी अजब सूचना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर अमेरिकेतल्या वैद्यकीय तज्ज्ञांनी टीकेची झोड उठविली आहे. तसेच, राष्ट्राध्यक्षांचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका, असे आवाहन जंतुनाशक द्रव्यांच्या उत्पादकांनी जनतेला केले आहे. आर्द्र्रता व सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात आल्यास कोरोना विषाणू इतर वेळेच्या तुलनेत अधिक वेगाने नष्ट होतात, असे अमेरिकेच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे मंत्री बिल ब्रायन यांनी म्हटले आहे.यादृष्टीने अमेरिकी शास्त्रज्ञांनी केलेल्या काही प्रयोगांतून हा निष्कर्ष काढण्यात आला होता. त्या प्रयोगाच्या अहवालातील निष्कर्ष ब्रायन यांनी ट्रम्प यांच्या उपस्थितीत पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, की इसोप्रोपील अल्कोहोलमुळे अवघ्या तीस सेकंदांत विषाणू मरतात, हे ऐकल्यानंतर ट्रम्प चकित झाले. कोरोना विषाणू श्वसनसंस्थेवर हल्ला करतो. त्याच्यामुळे फुफ्फुसे निकामी होतात. शरीरामध्ये जंतुनाशक द्रव्ये (डिसइन्फेक्टन्ट) टोचून कोरोना विषाणू नष्ट करता येतील का, अशी विचारणा तसे प्रयोग करून पाहायला काय हरकत आहे, अशी सूचना ट्रम्प यांनी केली. त्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित सारेच जण चक्रावले.>वैद्यकीय तज्ज्ञांची ट्रम्प यांच्यावर जोरदार टीकाजंतुनाशक द्रव्ये अत्यंत विषारी असून ती शरीरात टोचण्याचा कोणीही विचार करू नका, असा सल्ला अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. शास्त्रीय माहिती न घेता वाट्टेल त्या सूचना करीत असल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या तज्ज्ञांनी सडकून टीका केली आहे. विषाणू नष्ट करण्यासाठी जंतुनाशके शरीरात टोचली गेली तर त्या विषारी द्रव्यामुळे विषाणूचे माहीत नाही; पण आधी तो माणूस मरेल, असे न्यूयॉर्क येथील वैद्यकीय तज्ज्ञ क्रेग स्पेन्सर यांनी सांगितले. ही जंतुनाशके कोणीही टोचून घेऊ नका, असे आवाहन लायजॉल व डेटॉल ही जंतुनाशक द्रव्ये बनविणारे उद्योजक रेकिट बेंकसिअर यांनी केले.
CoronaVirus : विषाणूला मारण्यासाठी शरीरात टोचा जंतुनाशक द्रव्ये; डोनाल्ड ट्रम्प यांची अजब सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2020 2:46 AM