लंडन - भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असतानाच जगातील इतर अनेक देशांमध्येही कोरोनाचे संकट वाढत आहे. (Coronavirus News) त्याचदरम्यान आता ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूच्या ट्रिपल म्युटेंटच्या चर्चेने जोर धरला आहे. ब्रिटनमधील आरोग्य सचिव मँट हेनकॉक यांनी सांगितले की, यॉर्कशायरमध्ये पहिल्यांदाच दिसलेल्या नव्या ट्रिपल म्युटेंट कोरोना विषाणूच्या व्हेरिएंटचा तपास केला जात होता. मात्र याबाबत अद्याप कशी कुठलीही माहिती मिळालेली नाही ज्यामधून हा म्युटेंट अधिक धोकादायक आहे वा संसर्गजन्य आहे असे म्हणता येईल. (A triple mutant of the coronavirus in Britain during the second wave? New patient growth of 10.5 per cent)
मिळालेल्या माहितीनुसार पब्लिक हेल्थ इंग्लंडने शुक्रवारी सांगितले की, त्यांच्याकडून स्ट्रेन VUI-21MAY-01वर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले होते. या स्ट्रेनची माहिती पहिल्यांदा एप्रिल महिन्यात मिळाली होती. देशभरात VUI-21MAY-01चे ४९ रुग्ण सापडले आहेत. हे रुग्ण मुख्यत्वेकरून इंग्लंडमधील उत्तरेतील यॉर्कशायर आणि हंबरच्या आसपासच्या भागातील आहेत.
ब्रिटनमध्ये शनिवारी कोरोनाच्या २६९४ नव्या रुग्णांची नोंद झाली. सरकारी आकडेवारीनुसार १६ ते २२ मेदरम्यान देशात कोरोनाच्या १७ हजार ४१० नव्या रुग्णांची नोंद झाली. ही संख्या गेल्या सात दिवसांच्या तुलनेत १०.५ टक्क्यांनी अधिक आहे.
तसेच गेल्या २८ दिवसांत येथे कोरोनामुळे सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. देशात कोरोनाविरोधातील अभियान वेगाने सुरू आहे. २१ मेपर्यंत एकूण ३७.७३ दशलक्ष लोकांना कोरोना विषाणूविरोधातील लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. तर आतापर्यंत २२.०७ दशलक्ष लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे.