वॉशिंग्टन: कोरोना विषाणूवरून ताणले गेलेले अमेरिका आणि चीनचे संबंध दिवसागणिक आणखी बिघडत आहेत. चीनच्या विरोधात आता अमेरिकेनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. चीनहून येणारी सर्व विमानं रोखण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनानं घेतला आहे. अमेरिकेच्या वाहतूक विभागानं आज याबद्दलची घोषणा केली. त्यामुळे आता चीनमधून येणाऱ्या विमानांना अमेरिकेत उतरता येणार नाही. विमान प्रवासाबद्दल अमेरिका आणि चीननं काही नियम ठरवले होते. त्याबद्दल त्यांनी सामंजस्य करारदेखील केला होता. या करारातल्या नियमांचं पालन करण्यात चीन अपयशी ठरत असल्याचा दावा करत ट्रम्प प्रशासनानं चीनहून अमेरिकेला येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे जगातल्या दोन बड्या अर्थव्यवस्था आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. त्यांचे संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होऊ लागले आहेत. चीनवरून येणाऱ्या विमानांना १६ जूनपासून अमेरिकेत उतरता येणार नाही. अमेरिकेच्या डेल्टा एअरलाईन्स आणि युनायटेड एअरलाईन्सनं याच महिन्यात चीनला जाणाऱ्या विमानसेवा पुन्हा सुरू केली. कोरोना संकट काळातही चिनी विमान कंपन्यांची विमानं सेवा सुरू होती. त्यांची विमानं अमेरिकेच्या विविध शहरांमध्ये उतरत होती. मात्र आता अमेरिकेनं चीनमधून येणाऱ्या विमानांवर निर्बंध लादले आहेत. याआधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. कोरोना प्रकरणात चीनच दोषी असल्याचा आरोप त्यांनी अनेकदा केला आहे. मात्र चीननं या आरोपांचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला आहे. चीनला एकटं पाडण्याच्या दृष्टीनं अमेरिकेनं वेगवेगळ्या पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. जी-७ देशांच्या परिषदेत भारतानं सहभागी व्हावं, यासाठी कालच ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विशेष आमंत्रण दिलं. जी-७ परिषदेतील देशांची संख्या ११ वर नेण्याचा ट्रम्प यांचा मानस आहे.