वॉश्गिंटन – जगभरात कोरोना व्हायरसचा फैलाव झपाट्याने वाढत असताना आतापर्यंत २३ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १ लाख ६० हजारांहून जास्त लोकांना मृत्यू झाला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत गेला. नेमका हा व्हायरस आला कुठून? यावरुन अमेरिका आणि चीनमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.
अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा देताना सांगितले आहे की, जर कोरोना व्हायरस जाणुनबुजून पसरवण्यामागे चीनचा हात असेल तर त्याचे परिणाम भोगायला चीनने तयार व्हावं असं त्यांनी सांगितले आहे. कोविड १९ बाबत चीन माहिती लपवत असून यातील आकडेवारीची पारदर्शकता आणि अमेरिकेसोबत सुरुवातीच्या असहकार्यावर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
व्हाइट हाऊसच्या पत्रकार परिषदेत बोलताना ट्रम्प म्हणाले की, जर जाणुनबुजून चीन कोरोना व्हायरस पसरवण्यामागे जबाबदार असेल तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहावं. लोकांच्या जीवनाबद्दल आपण बोलत आहोत. कोविड १९ जगभरात पसरण्यापूर्वी चीनसोबत आमचे चांगले संबंध होते. चीनच्या कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारीवर ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली. चीनमध्ये अमेरिकेपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. ट्रम्प यांनी हे वक्तव्य त्यावेळी केलं होतं जेव्हा चीनमध्ये कोरोना व्हायरसचं केंद्र असलेल्या वुहानमध्ये मृतांचा आकडा अचानक ५० टक्क्यांनी वाढला होता.
चीनबरोबर व्यापार कराराची आठवण करत ट्रम्प म्हणाले की जेव्हा आम्ही करार करत होतो तेव्हा संबंध खूप चांगले होते, पण अचानक कोरोनाबाबत जेव्हा समजलं त्यानंतर हे अंतर वाढलं आहे. एका पत्रकारने ट्रम्प यांना तुमचा चीनवर राग आहे का असा प्रश्न केला. त्यावेळी ते म्हणाले. याचं उत्तर मोठं असू शकतं. परंतु ते परिस्थितीवर अवलंबून आहे. एका चुकीमुळे गोष्टी नियंत्रणाबाहेर जातात आणि जर हेतूपुरस्सर केले जात असेल तर त्यात फरक आहे असं ट्रम्प म्हणाले.
दरम्यान, दोन्हीही परिस्थितीत त्यांनी आम्हाला कळवणं गरजेचे होते. आम्ही त्यांना सुरुवातीपासून विचारलं पण त्यांनी याबाबत काहीच माहिती दिली नाही. मला वाटतं की, काही चुकीचं घडलं पण त्यांना सांगण्याची लाज वाटत असेल हे चीनला माहिती असावं. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत माजी राष्ट्राध्यक्ष जोए बिदेन जिंकावे असं चीनला वाटतं हा दावा ट्रम्प यांनी केला. बिदेन हे डेमोक्रेटिक पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आहेत. बिदेन जिंकले तर अमेरिकेवर चीनचा कब्जा असेल असा दावाही डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.