अमेरिकेतल्या प्राणी संग्रहालयात वाघिणीला कोरोनाचे संक्रमण झाल्याचे वृत्त समोर आले होते. वाघाची देखरेख करणाऱ्या झू-कीपरकडूनच संबंधित वाघिणीला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले होते. त्यामुळे माणसापासून प्राण्याला कोरोनाची लागण होऊ शकते अशी ती पहिली घटना समोर आली होती. मात्र आता वाघाची मावशी म्हणून संबोधल्या जाणाऱ्या आणि माणसाच्या अगदी जवळ वावरणाऱ्या मांजरीलाही कोरोनाची लागण झाली असल्याचे आता समोर आले आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानूसार, अमेरिकेत माणसांच्या बरोबरीने प्राण्यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. न्यू यॉर्क शहरातील दोन मांजरींचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे या वृत्तानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
कोरोना लस तयार करण्याचे संशोधन सध्या अनेक देशांमध्ये युद्ध पातळीवर सुरु आहे. तशात माणसांआधी प्राण्यांवर या लसीचे परीक्षण करणं सुरु आहे. लसीच्या संशोधनाच्या दृष्टीने, मांजराला कोरोनाची लागण होणे ही एक महत्त्वाची बाब समजली जात आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या वाइल्डलाइफ कन्झर्वेशन सोसायटीच्या मते, कोरोना प्राणीसंग्रहालयातील एका कर्मचाऱ्यामुळे 4 वर्षाच्या या वाघिणीला कोरोनाची लागण झाली होती. या कर्मचाऱ्याला आधीपासूनच कोरोनाचा संसर्ग झाला असेल आणि वाघिण त्याच्या संपर्कात आल्यानंतर ती कोरोना पॉझिटीव्ह झाला. या घटनेनंतर गेल्या १६ मार्चपासून हे प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे या वाघिणीच्या संसर्गातून पर्यटकांना लागण झाल्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, आता प्राण्यांनाही कोरोनाची लागण होऊ शकते हे सिद्ध झाले आहे.