वॉश्गिंटन - चीनच्या वुहान शहरातून सुरु झालेला कोरोना व्हायरस जागतिक महामारी बनला आहे. चीनच्या वुहान शहरातून कोरोना कमी होत असून जगातील अन्य देशात दिवसेंदिवस या व्हायरसचा प्रसार वाढत चालला आहे. चीन, इटली, इराक, भारत, अमेरिकासह अनेक देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाला आहे. चीननंतर इटलीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण दगावले आहेत.
बुधवारी अमेरिकेतील २ खासदारांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे १५० जणांचा मृत्यू झाला आहे. दहा हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसच्या प्रार्दुभावानंतर पहिल्यांदाच गुरुवारी एकही कोरोनाचा रुग्ण आढळून न आल्याचं समोर आलं आहे. जागतिक पातळीवर कोरोनाची दहशत कायम आहे.
अमेरिकेतील रिपब्लिकन पार्टीचे फ्लोरिडाचे काँग्रेस सदस्य मारियो डियाज बलार्ट पहिले अमेरिकेचे खासदार आहेत ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. बलार्ट यांच्या कार्यालयाने सांगितले की, शनिवारी मारिया डियाज यांना ताप आणि डोकेदुखीचा त्रास जाणवू लागला. त्यानंतर बुधवारी त्यांची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. त्याचसोबत डेमोक्रिटिक पार्टीचे सदस्य बेन मैकएडम यांनाही असा त्रास जाणवू लागला. त्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं.
बुधवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आरोग्य आपत्ती घोषित केली. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी अमेरिकन सीनेटने १०० अरब डॉलरचा आपत्कालीन निधीला मान्यता दिली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वाक्षरीनंतर हे पॅकेज लागू करण्यात येणार आहे.
तुर्कीत कोरोनाग्रस्तांची संख्या १९१ पोर्तुगालमध्ये आतापर्यंत ४४८ कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. अंकारा या दैनिकाच्या वृत्तानुसार तुर्कीत कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या १९१ वर पोहचली आहे.
दरम्यान, जगभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बुधवारी (18 मार्च) दुपारी 2,19,033 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे 170 हून अधिक देश प्रभावित झाले असून मृत्यूची संख्या 8,953 वर पोहोचली आहे. दुसरीकडे 82909 लोक बरेही झाले आहेत. आशियाई देशांपेक्षा युरोपमध्ये मृत्यूंची संख्या जास्त आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 171 पर्यंत पोहोचली आहे.