वॉशिंग्टन: चीनमधून पसरलेल्या कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून त्याचा फटका जवळपास सगळ्याच देशांना बसला आहे. अमेरिकेनं सुरुवातील कोरोनासाठी थेट चीनला जबाबदार धरलं होतं. मात्र आता चीनच्या वुहानमधल्या प्रयोगशाळेला अमेरिकेनंच कोट्यवधींचा निधी दिल्याची माहिती समोर आली आहे. युन्नात प्रांतातल्या गुहांमध्ये असलेल्या वटवाघळांमुळे कोरोना पसरल्याचा संशय आहे. याच गुहेतल्या वटवाघळांवर संशोधन करण्यासाठी अमेरिकेनं वुहानमधल्या प्रयोगशाळेला मोठ्या प्रमाणात निधी दिल्याचं उघड झालं आहे.युन्नानमध्ये असलेल्या सस्तन प्राण्यांवर वुहान विषाणूशास्त्र संस्थेनं प्रयोग केले. यातूनच पुढे कोरोनाचा विषाणू पसरल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे अमेरिकन सरकारनं वुहानमधल्या प्रयोगशाळेला संशोधनासाठी ३.७ मिलियन अमेरिकन डॉलर्सचं अनुदान दिलं होतं. कोरोनाचा विषाणू वुहानमधल्या मांस बाजारातून परसल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. त्यानंतर मात्र कोरोनाचा संबंध युन्नानमधल्या गुहांमध्ये असल्याची माहिती समोर आली.वुहानमधल्या प्रयोगशाळेतूनच कोरोना विषाणूचा फैलाव झाल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यात या प्रयोगशाळेला अमेरिकन सरकारच निधी पुरवत असल्यानं अमेरिकन संसदेचे सदस्य आणि दबाव गटांनी सरकारला धारेवर धरलं. वुहानमध्ये प्राण्यांवर सुरू असलेल्या क्रूर आणि गंभीर प्रयोगांसाठी अमेरिकन सरकार पैसा पुरवतं हे अतिशय धक्कादायक असल्याचं अमेरिकन संसदेचे सदस्य मॅट गॅट्स यांनी म्हटलं. व्हाईट कोट वेस्ट या अमेरिकन दबाव गटाचे अध्यक्ष अँथॉनी बेल्लोट्टी यांनीदेखील अमेरिकन सरकारवर कठोर शब्दांत आसूड ओढले. अमेरिकन सरकार नागरिकांचा कररुपी पैसा चीनमध्ये अशा प्रयोगांसाठी वापरतं हे निषेधार्ह आहे. विषाणू असलेले प्राणी प्रयोग केल्यानंतर वुहानमधल्या मांस बाजारात विकले जात असावेत. त्यातूनच त्या विषाणूंचा फैलाव झाला असावा, असं बेल्लोट्टी म्हणाले.
CoronaVirus: कोरोनामागे अमेरिका?; वुहानमधल्या 'त्या' लॅबला ३.७ मिलियन डॉलर्स दिल्याचं उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 8:46 AM