टेक्सास: जगातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा सव्वा कोटींच्या पुढे गेला असून त्यात अमेरिकेतील नागरिकांचं प्रमाण लक्षणीय आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्येष्ठांना असल्याचं आतापर्यंत दिसून येत होतं. मात्र आता तरुणांनादेखील कोरोनाचा मोठा धोका असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे. अमेरिकेत कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव होत आहे. त्यात आता तरुणांकडून आयोजित केल्या जाणाऱ्या कोरोना पार्ट्यांमुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोणाची रोगप्रतिकारशक्ती अधिक आणि कोणाला लवकर कोरोनाची लागण होणार, हे पाहण्यासाठी अमेरिकेत काही ठिकाणी कोरोना पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत आहे. टेक्सासमध्ये अशाच एका पार्टीला उपस्थित राहिलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.टेक्सासमध्ये एका कोरोना रुग्णानं पार्टीचं आयोजन केलं होतं. त्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. सॅन फ्रॅन्सिस्कोमधल्या मेथोडिस्ट रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी जेन ऍपलबाय यांनी याबद्दलची माहिती दिली. कोरोना म्हणजे थट्टेखातर करण्यात आलेली लबाडी असल्याची तरुणाची समजूत होती. मात्र कोरोनाची लागण झाल्यानं तरुणाचा मृत्यू झाला. 'एखाद्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर तो त्याच्या मित्रांसाठी पार्टीचं आयोजन करतो. मित्रांना कोरोना झाल्यास ते त्यावर मात करू शकतात का, त्यांची रोगप्रतिकार क्षमता किती, हे पाहण्यासाठी पार्ट्यांचं आयोजन करण्यात येत आहे,' अशी माहिती ऍपलबाय यांनी दिली. हा प्रकार अतिशय धक्कादायक असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे मृत पावलेल्या तरूणानं त्याच्या शेवटच्या क्षणी पार्टीला जाऊन आपण चूक केल्याचं म्हटलं.कोरोना म्हणजे थट्टेखातर करण्यात आलेली लबाडी असल्याचं तरुणाचं मत होतं. आपण तरूण असल्यानं कोरोनाची लागण होणार नाही, असा ठाम विश्वास त्याला होता. त्यामुळेच तो कोरोना पार्टीला गेला, अशी माहिती ऍपलबाय यांनी दिली. अमेरिकेतील कोरोना रुग्णांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली असून मृतांचा आकडा १ लाख ३५ हजारांहून अधिक आहे. मात्र अद्यापही अनेकांना कोरोनाचं गांभीर्य समजलेलं नाही.
'कोरोना म्हणजे निव्वळ लबाडी' म्हणत तरुण कोविड पार्टीला गेला अन् धक्कादायक प्रकार घडला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 4:35 PM