अमेरिकेत 'कोरोना'च्या संसर्गामुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गुरुवारी एकाच दिवसात अमेरिकेत २,६०० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला होता. कोणत्याही देशात एकाच दिवसांत नोंदवण्यात आलेली ही सर्वोच्च संख्या आहे. अमेरिकेत मृतांची संख्या ही ३० हजारांहून अधिक झाली असल्याची माहिती 'जॉन हॉपकिन्स' विद्यापीठाने दिली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरीही या लॉकडाऊनच्या काळात आणि त्यानंतर काय नियम पाळायचे या संदर्भात ट्रम्प यांनी आज जनतेला संबोधित करताना तीन टप्प्याचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, लॉकडाऊन उठवण्यासाठी तीन फेजमध्ये योजना तयार करण्यात आली आहे. यामध्ये ज्या राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात असेल त्या राज्यातला लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेता येईल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्वांनी सोशल डिस्टन्सिंगचं कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता आहे. १० लोकांपेक्षा अधिक लोक सोशल डिस्टन्सिंगमध्ये असणार नाही. दूसऱ्या टप्प्यात ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, त्यांनी घरातच राहावं. तसेच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. तिसऱ्या टप्प्यात गर्दी नसणाऱ्या ठिकाणी देखील एकमेकांच्या संपर्कात आल्यास त्यातील वेळ कमी ठेवण्याची आवश्यकता आहे. सार्वजनिक ठिकाणी कामाव्यतिरिक्त वेळ घालवत थांबू नये, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
कोरोनाचा वेगानं वाढणारा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या त्रिसूत्री योजनेचा आवलंब करण्याची शिफारस राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केली आहे. त्यामुळे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारतात सोशल डिस्टन्सिंग, ज्या व्यक्तींना आधीपासूनच कुणतेही आजार आहेत त्या लोकांनी घराबाहेर पडू नये अश्या सूचाना दिल्या आहेत. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील नरेंद्र मोदी यांच्या पावलांवर पाऊल टाकत कोरोनाला रोखण्यासाठी कंबर कसली आहे.
अमेरिकेमध्ये गेल्या आठवड्यपासून मृतांचा आकडा रोज २००० पार करत होता. बुधवारीच केवळ १५०० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, गुरुवारी पुन्हा एकाच दिवशी २६०० लोकांचा बळी गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत ६ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण २७००० मृत्यू झाले आहेत. गेल्या शुक्रवारी २०६९ लोकांचा मृत्यू झाला होता. रविवारी आणि सोमवारी १५०० जणांचा मृत्यू झाला होता.
अमेरिकेला लॉकडाऊन केल्याने दिवसाला २५ दशलक्ष डॉलरचे नुकसान झेलावे लागत आहे. एकट्या न्यू यॉर्कमध्ये १० हजार जणांचा मृत्यू झाला असून आता या राज्यात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. यानंतर लुसीयाना आणि कॅलिफोर्निया ही राज्ये कोरोनाची हॉटस्पॉट बनली आहेत.