वॉशिंग्टन - अमेरिकेच्या फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनने (USFDA) पहिल्या सेल्फ कोविड टेस्ट किटला मंगळवारी मंजुरी दिली. या किटच्या माध्यमाने घरच्या घरीच कोरोना टेस्ट करता येईल. विशेष म्हणजे या किटच्या माध्यमाने केवळ 30 मिनिटांतच रिजल्ट मिळेल.
ल्यूकिरा हेल्थने तयार केली किट - यासंदर्भात USFDAने जारी केलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे, की ही सिंगल यूज टेस्ट किट ल्यूकिरा हेल्थने तयार केली आहे. इमरजन्सीमध्ये या किटचा वापर केला जाऊ शकतो. या किटच्या माध्यमाने स्वतःच नाकातील स्वॅब सॅम्पल घेऊन तपासणी केली जाऊ शकते. USFDAच्या मते, 14 वर्ष अथवा यावरील लोकांना या टेस्ट किटचा वापर करता येऊ शकतो.
घरच्या घरीच रिझल्ट देणारी पहिलीच किट - यासंदर्भात बोलताना, USFDAचे आयुक्त स्टिफन हान यांनी म्हटले आहे, की आतापर्यंत घरी जाऊन कोरोना टेस्ट सॅम्पल घेण्याची परवानगी होती. याचा रिझल्ट नंतर येत होता. मात्र, ही पहिलीच अशी किट आहे, जिच्या सहाय्याने आपण स्वतः आपली टेस्ट करून घरच्या घरी रिझल्ट पाहू शकतो. USFDAने म्हटले आहे, की रुग्णालयांतही या किटचा वापर केला जाऊ शकतो. मात्र, 14 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्यांसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यालाच टेस्ट सॅम्पल घ्यावे लागेल.
अमेरिकेत पुढील वर्षी जुलैपर्यंत सर्वांना टोचली जाईल कोरोनाला लस -अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांच्या लसिकरणासाठी करण्यात आलेल्या योजनेला गती दिली आहे. पुढील महिन्यापासून या अभियानाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत दोन कोटी लोकांना लस टोचली जाईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. एप्रिलपर्यंत तेथे लसीचे 70 कोटी डोस तयार होतील. यानुसार, अमेरिकेत सर्व नागरिकांच्या लसिकरणाचे काम एप्रिल ते जुलै महिन्यात पार पडेल. मॉडर्ना आणि फायझरने तयार केलेल्या लसींचे एकाव्यक्तीला दोन डोस घ्यावे लागणार आहेत.