कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान लसीकरण मोहीम ही वेगाने सुरू आहे. माणसांचे लसीकरण सुरू असताना आता प्राण्यांना देखील कोरोना लस देण्यास सुरुवात झाली आहे. अमेरिकेतील एका प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना कोरोना लस देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्कोमधील बे एरियातील ऑकलँड (Oakland Zoo) येथील प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना कोरोनाची लस देण्यात येत आहे. या प्राणिसंग्रहालयातील अस्वले, वाघांना लस देण्यात आली आहे. या प्राणिसंग्रहालयातील जिंजर आणि मोली हे वाघ लसीकरण केलेले पहिले दोन प्राणी आहेत. प्राण्यांना देण्यात येणारी ही लस न्यू जर्सी येथील अॅनिमल हेल्थ कंपनी झोएटीसने (Zoetis) तयार केली आहे. ऑकलँड प्राणिसंग्रहालयाने ट्विट करून दिलेल्या माहितीनुसार, झोएटीसच्यावतीने प्राण्यांचे लसीकरण करण्यासाठी 11 हजार डोस देण्यात आले आहेत. या लशी 27 राज्यातील जवळपास 70 प्राणिसंग्रहालयात पाठवण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात वाघ, अस्वल, फॅरेट्स (मुंगूसाची एक प्रजाती) आदी प्राण्यांना लस देण्यात येणार आहे.
झोएटीसचे वरिष्ठ उपाध्यक्ष महेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी हाँगकाँगमध्ये पहिल्यांदा पाळीव श्वानाला कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर त्यांच्या कंपनीने पाळीव प्राण्यांना देण्यात येणाऱ्या लसीवर काम सुरू केले. हाँगकाँगमधील प्रकरण उघडकीस आल्यानंतर लसीवर काम सुरू झाले आणि आठ महिन्यांच्या आत पहिला अभ्यासही पूर्ण झाला. जागतिक आरोग्य संघटनेसमोरही ही माहिती सादर करण्यात आली होती. सध्या पाळीव प्राण्यांना लशीची आवश्यकता नाही. त्यामुळे प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांचे लसीकरण सुरू असून जेणेकरून संसर्गापासून त्यांचा बचाव होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
कोरोनाग्रस्तांपासून पाळीव प्राण्यांना संसर्ग?, जाणून घ्या कितपत असतो धोका; रिसर्चमधून मोठा खुलासा
कोरोनावर जगभरात संशोधन सुरू आहे. जर एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली असेल तर त्यातून पाळीव प्राण्यांना संसर्गाची बाधा होऊ शकते का?, यावरही आता संशोधन करण्यात आलं आहे. नेदरलँड्समधील युक्ट्रेट विद्यापीठाच्या संशोधकांनी कोरोनाग्रस्तांच्या घरातील पाळीव श्वान, मांजरी यांच्यातील संसर्गावर संशोधन केले. या संशोधनात पशू वैद्यकीय दवाखान्याच्या माध्यमातून संसर्गबाधित व्यक्तींच्या घरातील श्वान आणि मांजरींची स्वॅब चाचणी केली. रक्तचाचणीतून अँटीबॉडीजही तपासण्यात आल्या. या संशोधनात 196 घरांतील 156 श्वान आणि 154 मांजरींची तपासणी करण्यात आली. पीसीआर तपासणीत सहा मांजरी आणि सात श्वानांना संसर्गाची बाधा झाल्याचे समोर आले.
31 मांजरी आणि 23 श्वानांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. यूट्रेक्ट विद्यापीठाच्या एल्स ब्रोइंस यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाबाधित व्यक्तींनी घरातील पाळीव श्वान आणि मांजराच्या संपर्कात येण्यास टाळले पाहिजे. ब्रोइंस यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य चिंता प्राण्यांच्या आरोग्याची नाही. तर, त्यांच्या शरिरात विषाणूने प्रवेश केल्यास हा विषाणू पुन्हा स्वरूप बदलून मानवी शरिरात पुन्हा प्रवेश करण्याचा धोका आहे. कोरोनाग्रतांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 13 पाळीव प्राण्यांना लागण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत.