चीनसह संपूर्ण जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही अनेक राज्यांनी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या ३९६ वर पोहचली आहे तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. जगात ३ लाख ३० हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर १४ हजारांहून अधिक लोक मृत्युमुखी पडले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाच्या आजारावर अजूनही अधिकृतपणे मंजूर असे औषधाचा शोध लागू शकला नाही.
कोरोना व्हायरस हा विषाणू पूर्णपणे नवीन आहे. तसेच लस तयार करणे ही एक दिर्घकाळ लागणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी खर्चदेखील भरपूर येतो. शिवाय, अशा लसी व्यापारी दृष्टीकोनातून फायदेशीर ठरत नाही त्यामुळे व्यावसायिक औषध कंपन्यांना अशी लस तयार करण्याच्या प्रेरणा कमी असतात आणि संशोधनालाही प्रोत्साहन कमी मिळते. तरीही सरकारच्या आग्रहानूसार काही कंपन्या त्यावर काम करत आहेत.
केंब्रिज येथील मॉडर्नना थेरपीटिक्सने एवढ्यात चाचणीसाठी एक लस सादर केली आहे. निरोगी लोकसंख्येस लस देण्यापूर्वी यातून हानी होण्याचा धोका कमी आहे आणि उपयोग जास्त आहे, अशी खात्री संशोधकांनी करुन घेतली. त्यानंतर त्या लसीची चाचणी आधी जनावरांमध्ये व नंतर लोकांमध्ये करावी लागते. यासाठी बऱ्याच महिन्यांचा कालावधी लागतो असं ओरोग्य तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.
कोरोना व्हायरसचा उपचार कसा केला जातो-
कोरोना व्हायरससाठी सध्या अधिकृतपणे मंजूर असे औषध नाही. या विषाणूची लागण झालेल्या लोकांमध्ये असलेली लक्षणे दूर करण्यासाठी विश्रांती, द्रवरुप आहार आणि तापाचे नियंत्रण यासारखी सहायक काळजी घ्यावी. खोकला शामवणारी औषध, ताप नियंत्रित करणारे औषध, विश्रांती देणारे औैषध अशा रोगाच्या लक्षणांप्रमाणे आवश्यक वाटणारी नेहमीचे औषधे देण्यात येतात. गंभीर प्रकरणांत महत्वपूर्ण अवयवांचे कार्य योग्य प्रकारे चालण्यासाठी काळजी घेणारे उपचार करणे आवश्यक आहे.
उपचार काय आहे-
हार्वर्ड मेडिकल स्कूल आणि चिनी शास्त्रज्ञ यांच्यातील सामंजस्याने यावर काम करीत आहे. आतापर्यत तेथे ठोस काही झाले नाही. नॅशनल इनिस्टीट्यूट ऑफ हेल्थने कोरोनावर उपचार करु शकतो की नाही हे पाहण्याकरीता रेमडेसिव्हिर नावाच्या विषाणूविरोधी चाचणी सुरु केली आहे. परंतु या सर्व प्रयत्नांना काही महिने लागतात. कदाचित दीडे ते दोन वर्षही लागू शकतील. दरम्यानच्या काळात कोरोनाचे रुग्ण रुग्णालयात जातात तेव्हा त्यांना सहाय्यकारी काळजी घेणारा औषधोपचार केला जात आहे. जेणकरुन डॉक्टर रुग्णांना श्वोसोच्छास घेण्यास आणि त्यांच्या रोगप्रतिकारकशक्तींना विषाणू पराभूत होईपर्यत संक्रमणांपासून दूर राहण्यास मदत करतात. एड्सविरोधात केले जाणारे औषध- उपचार उपयोगी पडत असल्याचे दिसून आले आहे.