कराची - जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून प्रत्येकजण कोरोनापासून दूर पळत आहे. विदेशात म्हणजेच चीन, इटली, स्पेन, अमेरिका, लंडन येथे असलेले भारतीय नागरिक आपल्या मायदेशी परतत आहेत. मायदेशातील महानगरांमध्ये असलेले नागरिक आपल्या गावाकडे निघाले आहेत. जो-तो कोरोनापासून दूर पळत आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये कोरोनाबाधित रुग्णासोबत सेल्फी काढण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पाकिस्तानतही कोरोना व्हायरस वेगाने पसरत असून मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये याचा प्रादुर्भाव होताना दिसून येतंय. मूळात कोरोनाची लक्षणे उशिराने जाणवतात. त्यामुळे तोपर्यंत या रोगाचा संसर्ग इतरत्र पसरलेला असतो. कराचीतील ६ सरकारी अधिकाऱ्यांना याचा परिणाम भोगावा लागला आहे. पाकिस्तानमध्ये या ६ अधिकाऱ्यांनी कोरोनाबाधित रुग्णाशी सेल्फी घेतल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. विशेष म्हणजे तसा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा सेल्फी समोर येताच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार खैरपूर जिल्ह्यातील सहआयुक्तांनी महसूल विभागातील ६ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. हे सहाही अधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्यास असून त्यांनी एका कोरोना पॉझिटीव्ह रुग्णासोबत सेल्फी घेतला होता. हा कोरोनाबाधित रुग्ण नुकताच इराणतून पाकिस्तानात आला आहे. एका धार्मिक यात्रेवरुन आलेल्या आपल्या मित्राला भेटण्यासाठी हे सर्व अधिकारी एकत्र आले होते. त्यावेळी, या व्यक्तीला कोरोनाची कुठलिही लक्षणे नव्हती. मात्र, त्यानंतर संबंधित व्यक्तीची तपासणी केली असता, तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समजले. त्यानंतर, या व्यक्तीसोबतचा अधिकाऱ्यांनी घेतलेला सेल्फी समोर आल्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आले. तसेच, या सहाही अधिकाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, पाकिस्तानमध्ये आत्तापर्यंत कोरोनामुळे ६ जणांनी आपला जीव गमावला आहे. त्यामध्ये बलुचिस्तान येथे कोरोनाच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला होता. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 89वर पोहोचली असून, त्यांच्यावर सध्या कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहे. तर राज्यात कोरोनानं आतापर्यंत तिघांचा बळी गेला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी राज्यानं कलम 144 लागू केलं असून, मुंबईतली लोकल सेवा, लांब पल्ल्याच्या मेल एक्स्प्रेस गाड्या बंद केलेल्या आहेत. तसेच लोकांना 31 मार्चपर्यंत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.