नवी दिल्ली - जगात पुन्हा एकदा कोरोना व्हायरसचा फैलाव सुरू झाला आहे. काही महिन्यांपासून नियंत्रणात असलेली परिस्थिती पुन्हा बिघडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येत वाढ होत असून मृतांचा आकडाही वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. बदलत्या आकडेवारीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) अलर्ट जारी केला आहे. कोरोनाच्या नव्या लाटेपासून सावध राहा असं WHO नं आवाहन केले आहे.
WHO चे प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, आता आपल्याला कोरोनाच्या नव्या लाटेसाठी सज्ज राहावं लागणार आहे. जे नवे व्हेरिएंट समोर आले आहेत. त्याचे प्रत्येकाचे स्वरुप बदललेले आहे. जास्त वेगाने संक्रमित होताना पाहायला मिळत आहे. जितक्या मोठ्या प्रमाणात संक्रमित रुग्णांची संख्या वाढेल तितके रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाणही वाढेल. त्यामुळे बदललेल्या परिस्थितीला लक्षात घेऊन प्रत्येक देशाने त्यांच्याकडे एक एक्शन प्लॅन तयार ठेवायला हवा अशी सूचना त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या रुग्णांमध्ये आणखी एकदा वाढ होताना दिसत आहे. मृतांचा आकडा अलीकडे कमी झाला होता तोदेखील वाढला आहे. वर्ल्ड बँकेचे सल्लागार Philip Schellekens यांच्या ट्विटवर सौम्या स्वामीनाथन यांनी ट्विट केले आहे. सौम्या स्वामीनाथन यांनी जगातील प्रत्येक देशाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. सध्या अमेरिका, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि जपानमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. त्याचसोबत मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये ब्राझील सर्वात पुढे आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येत आणि मृतांचा आकडा वाढणे हे योग्य संकेत नाहीत असं WHO चे संचालक Tedros Adhanom Ghebreyesus यांनी म्हटलं आहे.
मागील आठवड्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले होते की, ओमायक्रॉन(Omicron) सबव्हेरिएंट BA4. BA.5 मुळे जगात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक देशात कोरोनाबाबत निष्काळजीपणा समोर येत आहे. चाचणीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे कुठल्याही व्हेरिएंटबाबत ठोस माहिती समोर येत नाही. कोरोना अद्याप संपला नाही. पुढील काळात आणखी काही कोरोनाची लाट पाहायला मिळू शकते. गेल्या आठवड्यात जगात ५.७ मिलियन कोरोना रुग्ण आढळले. कोरोनामुळे ९८०० लोकांनी त्यांचा जीव गमावला. फ्रान्समध्ये सर्वाधिक ७ लाख ७१ हजार २६० रुग्ण आढळले आहेत. भारतातही कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे WHO ने जगातील देशांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.