जगभरात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 2,481,026 वर पोहोचली आहे. आतापर्यंत या जीवघेण्या आजारामुळे 170,423 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र कोरोनाची ही फक्त सुरुवात आहे, वाईट काळ येणं अजून बाकी आहे असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अँडेनहॅम ग्रेब्रेयेसुस म्हणाले की, 1918 च्या फ्लूप्रमाणेच कोरोनासुध्दा एक अतिशय धोकादायक संसर्गजन्य रोग आहे. 1918 मध्ये या फ्लूने जवळपास एक कोटी लोकांचा जीव घेतला होता. त्याचप्रमाणे कोरोनाने देखील 1 लाख 70 हजारांहून अधिक लोकांचा बळी घेतला आहे. परंतु कोरोनाचा उद्रेक अजूनही झालेला नाही. तसेच जगभरात परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता असल्याचे देखील टेड्रोस अँडेनहॅम ग्रेब्रेयेसुस यांनी सांगितले. मात्र आता आपल्याकडे तंत्रज्ञान असल्यामुळे आपण ही आपत्ती टाळू शकतो अशी प्रतिक्रिया टेड्रोस अँडेनहॅम ग्रेब्रेयेसुस यांनी दिली आहे.
वेबसाइट वल्डोमीटरने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेमध्ये 792,759, स्पेनमध्ये 200,210, इटलीमध्ये 181,228, फ्रान्समध्ये 155,383 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतापर्यंत अमेरिकेमध्ये 42,514, स्पेनमध्ये 20,852, इटलीमध्ये 24,114, फ्रान्समध्ये 20,265 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, भारतातही देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 18 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनामुळे 47 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 1 हजार 336 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 18 हजार 601 वर पोहचली आहे. तर 590 जणांचा मृत्यू झाला आहे. 14 हजार 759 जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून 3252 लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे.