जिनिव्हा : कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून यावर मात करण्यासाठी सर्व देशांकडून प्रयत्न सुरु आहेत. जगभरात आतापर्यंत ८८ हजारहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर १५ लाखहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. कोरोनाच्या या परिस्थितीला अमेरिकेने चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेला(WHO) जबाबदार धरले असून त्यांच्यावर टीका केली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जागतिक आरोग्य संघटना चीनकडे जास्त लक्ष केंद्रीत करत असल्याचा आरोप केला. तसेच, अमेरिकडून जागतिक आरोग्य संघटनेला मिळणारा निधी रोखण्याची धमकीही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. याला आता जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अॅडहॅन घेब्रियेसुस यांनी उत्तर दिले आहे.
जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस अॅडहॅन घेब्रियेसुस म्हणाले, "कोरोना व्हायरसवरील राजकरणापासून वेगळे राहा. पक्ष, विचारसरणी, धार्मिक मते यांपासून बाजूला व्हा. कोरोनावर राजकारण करू नका, हे आगीशी खेळ करण्यासारखे आहे."
याचबरोबर, "ज्या ठिकाणी दरी निर्माण होते, त्याठिकाणी व्हायरस घुसू शकतो आणि आपल्याला हरवू शकतो. कोणत्याही देशाची व्यवस्था कितीही चांगली असती. तरी राष्ट्रीय एकतेशिवाय तो देश धोक्यात येऊ शकतो. राजकीय पक्षांकडे स्वत:ला सिद्ध करण्यासाठी अनेक मुद्दे असतील. मात्र, कृपाकरून कोरोना व्हायरसला राजकारणाचे शस्त्र बनवू नका," असे टेड्रोस अॅडहॅन घेब्रियेसुस यांनी सांगितले.
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प काल म्हणाले होते, "जागतिक आरोग्य संघटनेला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात निधी पुरविला जातो. ज्यावेळी प्रवासावर निर्बंध घातले होते, त्यावेळी त्यांनी माझ्यावर टीका आणि त्याबद्दल असहमती दर्शविली होती. बऱ्याच गोष्टींबद्दल ते चुकीचे होते. ते जास्तकरुन चीनला केंद्रित करत असल्याचे दिसून येते. आमच्याकडून जागतिक आरोग्य संघटनेवर खर्च होणाऱ्या निधीवर नियंत्रण आणले जाईल."
अमेरिकेत जॉन्स हॉपकिंस युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांत कोरोनामुळे जवळपास १९७३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर मंगळवारी १९३९ लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये जास्तकरून न्यूयॉर्कमधील नागरिकांचा समावेश आहे. याचबरोबर, जगभरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत १५ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर ८८ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.