नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण जग बेजार झालेले आहे. दरम्यान, कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी सध्या विविधा उपचार पद्धतींचा वापर केला जात आहे. तसेच कोरोनावरील उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा जगभराता मोठ्या प्रमाणावर वापर केला जात होता. दरम्यान, या औषधाच्या वापराला जागतिक आरोग्य संघटनेने काही दिवसांपूर्वी काही काळासाठी स्थगिती दिली होती. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने हायडॉक्सीक्लोरोक्वीनच्या वापराबाबत पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या औषधाच्या वापरावरील स्थगिती मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे या औषधाचा सर्वात मोठा निर्माता असलेल्या भारताला आणि या औषधाचा वापर करत असलेल्या जगातील अनेक देशांना दिलासा मिळणार आहे.
‘’हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन घेत असलेल्या लोकांमध्ये मृत्यू आणि हृदयासंबंधी निर्माण होत असलेला धोका विचारात घेऊन या औषधाच्या जागतिक स्तरावरील परीक्षणाला अस्थायी स्थगिती द्यावी लागेल, असे जागतिक आयोग्य संघटनेचे महासंचालक टेड्स एडनोम गेब्रेयसेस यांनी २५ मे रोजी पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले होते. मात्र जागतिक आरोग्य संघटनेने हा आदेश भारताला लागू केला नव्हता. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात रुग्णांवर उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाची चाचणी केली जात होती. मात्र हे कुठलेली चमत्कारीक औषध नसून काही बाबतीत ते धोकादायक ठरू शकते, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती.
दरम्यान, आयसीएमआरने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या औषधाचा बचाव केला होता. जागतिक आरोग्य संघटनेने हायड्रॉक्सिक्लोरोक्विन (एचसीक्यू) औषधाचा वापर न करण्याची मार्गदर्शिका प्रसिद्ध केली असली तरी भारतात मात्र या औषधाचा वापर सुरूच राहणार आहे, असे आयसीएमआरने स्पष्ट केले होते. भारतात या औषधाचा प्रभाव दिसू लागला. किरकोळ साइड इफेक्ट्स वगळता हे औषध प्रभावी ठरताना दिसते. औषधाची मात्रा लागू होण्याची शक्यता कमीच असली तरी धोकाही शून्य आहे, अशा शब्दात आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी उपचाराचे समर्थन केले होते. भारतात सुरू असलेल्या अभ्यासाचे निष्कर्षही त्यांनी मांडले होते.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा सर्वात मोठा उत्पादक असलेल्या भारताकडून या औषधाचा अमेरिका, यूएई आणि ब्रिटन या देशांना मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्म्प यांनी कोरोनावर हे औषध प्रभावी ठरत असल्याचा दावा केल्यानंतर अमेरिकेनेही या औषधाचा मोठ्या प्रामाणात साठा केला होता.