नवी दिल्ली – चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील १९० हून अधिक देशांमध्ये थैमान घातलं आहे. आतापर्यंत ५५ लाखाहून जास्त लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३ लाख ४० हजाराहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीपासून वाचवण्यासाठी वैज्ञानिक विविध पातळीवर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
या संघर्षाच्या काळात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी त्यांना हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध देण्यात येत होतं. मात्र या औषधावर सुरक्षेच्या कारणास्तव जागतिक आरोग्य संघटनेने बंदी आणली आहे. संघटनेने सोमवारी मलेरियावरील हे औषध कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी क्लिनिकल ट्रायल बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मागील आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार जागतिक आरोग्य संघटनेने हा निर्णय घेतला आहे.
या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं की, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या वापरामुळे कोरोना रुग्णांना मृत्यूचा धोका अधिक वाढतो. तसेच भारताच्या आरोग्य वैज्ञानिक संस्था(आयसीएमआर) ला कोरोना संक्रमित रुग्णांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाच्या वापराबाबत केलेल्या शिफारसीवर पुनर्विचार करावा लागेल. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध उपलब्ध झालेलं नाही. कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळ्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात होत्या. मात्र आता जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याने हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषधाची ट्रायल (चाचणी) करण्यास मज्जाव केला आहे.
हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर धोकादायक
मिलर फॅमिली हार्ट संस्थेचे मुख्य शैक्षणिक अधिकारी डॉ. स्टीव्हन ई. निसेन म्हणाले की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या अतिवापरामुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात. त्याचवेळी हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्रोफेसर डॉ. स्कॉट सोलोमन यांनीही याला प्राणघातक म्हटले आहे. काही आरोग्यतज्ज्ञांच्या मते हे औषध हृदय, मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम करते.