न्यूयॉर्क - भारतात जवळपास दोन वर्षांनी कोरोनाची लाट पूर्णपणे ओसरल्याचे दिसत आहे. मात्र जागतिक पातळीवर कोरोनाने पुन्हा एकदा घाबरवण्यास सुरुवात केली आहे. चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. तर हॉंगकाँगमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. केवळ चीन आणि हाँगकाँगच नाही, तर जगातील अनेक देशांत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं की, जगभरात Deltacron चे रुग्ण वाढू लागले आहेत. तसेच Deltacron कोरोनाची नवी लाट घेऊन येऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार फ्रान्स, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि डेन्मार्कसह युरोपमधील अनेक देशांमध्ये डेल्टाक्रॉनचे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेच्या काही भागांमध्येही डेल्टाक्रॉन व्हेरिएंटचे रुग्ण सापडले आहेत. मात्र सध्यातरी याचे रुग्ण खूप कमी आहेत. मात्र त्याच्यामुळे कोरोनाची नवी लाट आणू शकतो.
डेल्टाक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरिएंट यांचा मिळून बनला आहे. तज्ज्ञांच्या मते या व्हेरिएंटचा बॅकबोन डेल्टापासून तर त्याचं स्पाईक ओमायक्रॉनपासून बनलेले आहे. त्या दोन्ही व्हेरिएंटचा मिळून बनल्यानेच त्याचं नाव हे डेल्टाक्रॉन असे ठेवण्यात आले आहे.
तज्ज्ञांच्या मते जेव्हा व्हायरस म्युटेट होतो, तेव्हा अशाप्रकारचे कॉम्बिनेशन बघायला मिळतात. अशा परिस्थितीत एक व्यक्ती एकाच वेळी दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटपासून बाधित होऊ शकतो. या साथीमध्ये एकच व्यक्ती डेल्टा आणि ओमायक्रॉन अशा दोन्ही विषाणूंनी बाधित होतो.
मात्र हा विषाणू किती धोकादायक आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र तज्ज्ञांच्या मते डेल्टा व्हेरिएंट खूप धोकादायक होता. तर ओमायक्रॉन हा खूप संसर्गजन्य होता. अशा परिस्थितीत डेल्टा आणि ओमायक्रॉन हे एकत्र आल्याने जो व्हेरिएंट तयार झालाय तो खूप धोकादायकसुद्धा असू शकतो. कारण त्यामुळे लोक खूप प्रमाणात बाधित होऊ शकतात. तसेच आजाराचं गांभीर्य अधिक असू शकतं. मात्र तज्ज्ञांच्या मते अशा प्रकारे दोन व्हेरिएंटचे कॉम्बिनेशन होणे ही काही नवी बाब नाही आहे.