जगभरातील अनेक देशांत सध्या लॉकडाऊन आहे. महामारीचे केंद्र राहिलेल्या चीनमध्ये कोरोनाचे संकट काहीसे कमी झाले आहे. तेथील लॉकडाऊन हटवण्यात आले असून परिस्थिती पूर्ववत होत आहे. मात्र तरीही नागरिकांमध्ये कोरोनाची भीती कायम आहे. चीनमध्ये आता प्रत्येकाकडे संशयाने पाहिले जाते. अशात नागरिक इतरांना मदत करण्यासाठी पुढेही येत नाहीत. मात्र चीनमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या महिलेच्या मदतीसाठी अनेकजण धावून आल्याचे पाहायला मिळाले.
चीनमध्ये एका महिलेने रस्त्यातच बाळाला जन्म दिला आहे. बाजारातून ही महिला घरी जात होती. अचानक रस्त्यातच प्रसुती कळा सुरू झाल्या. तिने आपत्कालीन क्रमांक डायल केला आणि मदत मागितली. मात्र वेळेत रुग्णवाहिका पोहचू शकली नाही. भररस्त्यातच महिलेची डिलेव्हरी करावी लागली. या महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला आहे. यावेळी तिच्यासोबत वृद्ध व्यक्ती होती.
रस्त्यावरच्या जमलेल्या लोकांनी महिलेच्या वेदना पाहून मदतीसाठी धाव घेतली. जमलेल्या लोकांनाच अखेर तिची प्रसुती करावी लागली. आपण आपल्या मुलाला वाचवू शकणार नाही असा विचार एक क्षण तिच्या मनात आला. पण सुदैवानं दोघांचीही प्रकृती सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. जगभरात या व्हिडीओची चर्चा आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.