बीजिंग : कोरोना साथीचा उद्रेक जगातील विविध भागांत गेल्या वर्षाच्या अखेरीस झाला होता. मात्र, वुहान शहरातून ही साथ सुरू झालेली नाही असा दावा चीनने केला आहे.
चीनने म्हटले आहे की, विविध भागांमध्ये कोरोनाची साथ पसरली होती; पण या साथीचे अस्तित्व आम्ही सर्वात प्रथम जाहीर केले व ती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजनेलाही प्रारंभ केला. वुहान शहरातील एका प्रयोगशाळेतून कोरोनाचा विषाणू हवेत मिसळला व त्याची जगभर साथ पसरली असा अमेरिकेने केलेला आरोप बिनबुडाचा आहे, असेही चीनने म्हटले आहे.
चीनमधील बाजारामध्ये विक्रीसाठी असलेल्या वटवाघूळ किंवा खवल्या मांजरामधून कोरोनाचा विषाणू माणसांमध्ये संक्रमित झाला असाही आरोप करण्यात आला होता. त्यातही काही तथ्य नाही असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कोरोना विषाणू हा नव्या प्रकारचा असून, त्याच्या संसर्गाचे नेमके काय परिणाम होतात याविषयाही संपूर्ण चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
कोरोना विषाणूची साथ नेमकी कुठून सुरू झाली या गोष्टीवर पडदा टाकण्याचा प्रयत्न चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाकडून होत आहे. त्या पक्षाने केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच कोरोना साथीने महाभयंकर रूप धारण केले असा आरोपही पॉम्पेओ यांनी केला. ते सर्व आरोप चीनने फेटाळून लावले आहेत. शास्त्रज्ञांची यादी चीनला पाठविलीकोरोना साथीचा उगम कुठून झाला याबाबत जागतिक आरोग्य संघटना चौकशी करणार आहे. चौकशीसाठी शास्त्रज्ञांची यादी चीनला पाठविली जाईल. चीनच्या संमतीनंतर पथक चौकशीसाठी रवाना होणार आहे. या पार्श्वभूमीवर चीनने धूर्तपणाची भूमिका घेतली आहे. जगभरात ३ कोटी ७१ लाखांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून, १० लाखांपेक्षा अधिक लोकांचा बळी गेला आहे.