नवी दिल्ली : कोरोना विषाणूवर परिणाम करणारी लस विकसित करण्यासाठी मिलिंडा व बिल गेटस फाऊंडेशन पूर्ण निधी देणार आहे. तशी माहिती मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक आणि फाऊंडेशनचे सहअध्यक्ष बिल गेटस यांनी दिली आहे. तसेच कोरोना महामारीविरुद्धच्या उपाययोजना या आगामी काळातील मोठ्या संकटाला तोंड देण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या ठरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना विषाणूचे वैश्विक संकट सध्या सर्वत्र चिंतेचा विषय आहे. या विषाणूला नष्ट करणारी लस विकसित करणे आवश्यक आहे. संभाव्य सात लसींचे निर्माण करण्यासाठी कारखाने उभारण्याची घोषणा गेटस यांनी केली आहे. या वैश्विक संकटासाठी १०० मिलियन अमेरिकी डॉलर (जवळपास साडेसातशे कोटी रुपये) देण्याचे गेटस यांनी जाहीर केले आहे. कोरोनाचे सर्वाधिक बाधित हे विकसित देशात आहेत. याला तोंड देण्यासाठी योग्य पद्धतीने काम करावे लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
फेब्रुवारीत कोरोनासाठी आम्ही एक हजार कोटी रुपये खर्च केले होते. जोपर्यंत औषध आणि लस उपलब्ध होत नाही, तोवर यापुढेही खर्च करीत राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. आता प्रत्येक महिना महत्त्वाचा आहे. विकसनशील देशांकडे तर अत्यंत तोकड्या सुविधा आहेत. हे एक मोठे आव्हान आहे; पण योग्य पद्धतीने आपल्याला तोंड द्यावे लागेल. लॉकडाऊनचे पालन करणे अत्यावश्यक आहे. तेव्हाच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल, असे गेटस यांनी स्पष्ट केले आहे.
...तर जगाला फायदा होईल
संसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी फाऊंडेशन आजवर प्रभावी काम करीत आले आहे. आम्ही वेळ दवडू इच्छित नाही. सातपैकी दोन लसी जरी यशस्वी झाल्या तरी जगाला त्याचा फायदा होईल, असे गेटस यांनी म्हटले आहे. कोरोनाची तपासणी आणि उपचार याबाबत मोठे काम आवश्यक आहे.
आज अत्यंत तोकड्या सुविधा उपलब्ध आहेत. आगामी १८ महिन्यांत लस उपलब्ध होऊ शकते. त्यासाठी संशोधकांना अत्युत्तम तंत्रज्ञान आणि सुविधा गरजेच्या आहेत. त्या आम्ही देऊ. कोरोनाची लस शोधण्यासाठी कोट्यवधी रुपये पाण्यात जाणार असले तरी त्याची आम्हाला पर्वा नाही, असे गेटस यांनी स्पष्ट केले आहे.