अनेक वादविवादांनंतर पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी मतदार पार पडले होते. त्यानंतर मतमोजणीलाही सुरुवात झाली. मात्र पाकिस्तानी जनतेने काय कौल दिला आहे हे मतपेटीतून समोर येण्यापूर्वीच गोंधळाला सुरुवात झाली आहे. मतमोजणी बराच काळ बंद होती. त्यामुळे निकालाची माहिती माध्यमांना दिली जात नव्हती. त्यासोबतच माजी पंतप्रधान इम्रान खान यांनीही बराच काळ निवडणुकीचे अपडेट त्यांच्या सोशल मीडिया पेजवरून दिले नव्हते. दरम्यान, सुमारे दोन तासांनंतर निवडणूक आयोगाने निकाल प्रसिद्ध करण्यास सिरुवात केली आहे.
पाकिस्तानमध्ये गुरुवारी संध्याकाळी मतदान आटोपले होते. त्यानंतर लगेचच मतमोजणीला सुरुवात झाली होती. मात्र नंतर मतमोजणी खोळंबली होती. मतमोजणीस होत असलेल्या उशिराबाबत तक्रार केली होती. तसेच निवडणूक आयोगावरही प्रश्नचिन्हही उपस्थित केले होते. त्यानंतर वाढता विरोध पाहून पाकिस्तानमधील निवडणूक आयोगाने प्रांतीय निवडणूक आयुक्त आणि रिटर्निंग अधिकाऱ्यांना अर्ध्या तासाच्या आत निकाल घोषित करण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, समोर येत असलेल्या निकालांमध्ये पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बहुतांश जागांवर इम्रान खान यांच्या तहरीक ए इंसाफ पक्षाने विजय मिळवल्यानंतर रिटर्निंग अधिकाऱ्यांनी माध्यमांना निकाल देणे बंद केले होते. मात्र विरोधानंतर पुन्हा निकाल प्रसिद्ध करण्यास सुरुवात करण्यात आली होती. दरम्यान, अल जझीरा वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार मतमोजणीमध्ये बिलावल भुत्तोंच्या पीपीपीने २, नवाज शरीफ यांच्या पीएमएलएन आणि इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने प्रत्येकी चार जागांवर विजय मिळवला आहे.