किंग्डम आॅफ एन्क्लावा या देशाचं नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता अगदीच कमी. जगातील १ टक्का लोकांनाही हा देश माहीत नाही आणि तरीही तो अस्तित्वात आहे. या देशाचं क्षेत्रफळ आहे १000 चौरस फूट. म्हणजे दोन बेडरूम, किचन, हॉल एवढ्या आकाराइतकं. या देशाला संयुक्त राष्ट्रांची मान्यताही नाही. या देशात कोणीही राहत नाही. तरीही तो देश अस्तित्वात आहे. हा देश आहे क्रोएशिया आणि स्लोवेनिया यांच्या सीमेवर. मधून एक नदी वाहते. या भूभागावर क्रोएशिया आणि स्लोवेनिया या दोन्हींपैकी एकाही देशाने आपला हक्क सांगितला नाही. त्यामुळे या देशाची निर्मिती झाली.सर्वात लहान देश म्हणून ओळखल्या जाणाºया एन्क्लावामध्ये कोणीच राहत नाही. त्या देशाचा कोणी नागरिकही नाही. तरीही या देशाची निर्मिती करणाºयांनी एन्क्लावामध्ये कोणताही कर नसेल आणि इंग्लिश, पोलिश, स्लोवेनियन, क्रोएशियन व मँडरिन यापैकी कोणतीही भाषा या देशात चालेल, असं म्हटलं आहे.जगामध्ये असे अनेक छोटे देश आहेत, ज्यांना संयुक्त राष्ट्रांची मान्यता नाही. काही जण तर एखाद्या देशाच्या दुर्गम भागात जातात, तिथं वस्ती नसल्याचं पाहतात आणि या देशाची आपण निर्मिती करीत आहोत, असं सांगून देश जन्माला घालतात. पण एन्क्लावा हा कोणत्याच देशाचा भाग नाही, हे पाहून प्योत्र वॉवरझिंक्युविक्झ नावाच्या गृहस्थाने या देशाची निर्मिती केली.तो आणि त्याचे काही मित्र एकदा स्लोवेनियातील एका गावात फिरायला गेले होते. तेव्हा त्यांना कोणत्याच देशात नसलेला काही भूभाग तिथून जवळ असल्याचं कळलं. त्यानंतर त्यांनी किंग्डम आॅफ एन्क्लावाची स्थापना केली. या देशाच्या नागरिकत्वासाठी आतापर्यंत तब्बल ५000 लोकांनी अर्ज केला आहे. तीन वर्षांपूर्वी त्या देशात आॅनलाइन निवडणूकही झाली. त्यात ८00 लोकांनी मतदान केलं. अर्थातच आॅनलाइन. तसा देशही आॅनलाइनच आहे म्हणा!
1000 चौरस फूट आकाराचा देश, १ टक्का लोकांनाही माहीत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 2:46 AM