देशविदेश पान- सिरिया ५०० ठार
By admin | Published: August 25, 2014 9:40 PM
उत्तरपूर्व सिरियातील तबका
उत्तरपूर्व सिरियातील तबका हवाईतळ इस्लामिक स्टेटकडे------------------भीषण रक्तपात : दोन्ही बाजूंचे एकूण ५४२ ठार------------बैरूत : इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी उत्तरपूर्व सिरियातील तबका हा हवाईतळ सरकारी फौजांच्या ताब्यातून रविवारी अखेर हिसकावून घेतला. या संघर्षात इस्लामिक स्टेट व सिरियाचे जवान मिळून किमान ५४२ जण ठार झाले आहेत.सिरियातील मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या निरीक्षक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार १९ ऑगस्टपासून हे अतिरेकी तबका हा तळ ताब्यात घेण्यासाठी सरकारी फौजांशी संघर्ष करीत होते. त्यात इस्लामिक स्टेटचे ३४६ जण, तर १७६ सरकारी जवान ठार झाले. सिरियात इस्लामिक स्टेटच्या अतिरेक्यांनी सुरू केलेल्या युद्धातील ही सर्वात मोठी जीवित हानी आहे. सिरियाच्या ताब्यात असलेला या भागातील हा एकमेव हवाई तळ होता. बाकी सगळी ठिकाणे या अतिरेक्यांच्या ताब्यात आहेत. रविवारी तबका तळावर जोरदार संघर्ष झाला. सिरिया आणि इराकचा फार मोठा भूभाग आज या इस्लामिक स्टेट अतिरेक्यांच्या ताब्यात आहे.इस्लामिक स्टेटचा बालेकिल्ला असलेल्या राक्का शहरात या विजयाबद्दल गोळीबार करण्यात आला आणि मशिदींवरील भोंग्यांद्वारे तबका तळ इस्लामिस्टांना मिळाल्याचे व अल्ला सर्वश्रेष्ठ असल्याचे आनंदाने जाहीर करण्यात आले, असे तेथे उपस्थित असलेल्या व्यक्तीने रॉयटर या वृत्तसंस्थेला सांगितले. अतिरेक्यांनी सिरियाच्या लष्करी जवानांची अनेक मुंडकी शहराच्या चौकात दाखविली, असे तेथे प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या व्यक्तीने सांगितले. हवाई तळावर हल्ला झाल्यानंतर सिरियाच्या लढाऊ विमानांनी राक्का शहरावर घिरट्या घातल्या होत्या व रविवारी या विमानांनी तबका तळाभोवती बॉम्बने हल्ला केला होता.माघार घेत असलेल्या सिरियाच्या सुमारे १५० सैनिकांना इस्लामिक स्टेटने तळाच्या जवळच ताब्यात ठेवले असल्याचे या निरीक्षण यंत्रणेने म्हटले. शनिवारी सिरियाच्या लष्कराने तबका तळ ताब्यात ठेवण्यासाठी मोठा संघर्ष केल्याचे सिरियाच्या दूरचित्रवाणीने दाखविले होते. हा तळ इस्लामिक स्टेटच्या आक्रमणापासून सुरक्षित असल्याचे सांगितले जात होते.----------