प्रेस्पेस (ग्रीस) : पूर्वीच्या युगोस्लाव्हियातून वेगळे झालेल्या मॅसेडोनिया या देशाचे नाव बदलून ते ‘उत्तर मॅसेडोनिया प्रजासत्ताक’ असे करण्याबाबत रविवारी ग्रीस आणि मॅसेडोनिया यांच्यात करार झाला. दोन्ही देशांच्या संसदेची संमती मिळाल्यावर आणि मॅसेडोनियाच्या जनतेने सार्वमतात अनुकूल कौल दिल्यावरच हा नावबदल प्रत्यक्षात अंमलात येईल.ग्रीसचे पंतप्रधान अॅलेक्सिस त्सिपरास आणि मॅसेडोनियाचे पंतप्रधान झोरान झाएव यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या अणि ही ऐतिहासिक जबाबदारी दोन्ही देश नक्की पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला. (वृत्तसंस्था)>कशामुळे पेटला होता वाद?हा वाद १९९१ पासून सुरू आहे. ग्रीसमध्येही मॅसेडोनिया नावाचा एक प्रांत आहे. युगोस्लाव्हियातून फुटून निघालेल्या सेजारी देशाने तेच नाव घेतल्याने भविष्यात तो त्याच नावाच्या आपल्या प्रांतावर आणि ग्रीक संस्कृतीवर हक्क सांगेल, असा ग्रीकवासियांचा आक्षेप आहे. यातून मार्ग काढण्यासाठी वरीलप्रमाणे नावबदल करून मॅसेडोनियाचा ‘‘नाटो’ व युरोपीय संघातील प्रवेश् सुकर करण्याचा त्सिपरास यांचा प्रयत्न आहे.>सरकारवरच आले होते बालंट; ग्रीसच्या ७० टक्के नागरिकांचा विरोधमॅसेडोनिया या नावावरून ग्रीस आणि या शेजारी देशाचे संबंध कमालीचे ताणलेले आहेत. ‘नाटो’ व युरोपिय संघाचा ग्रीस सदस्य आहे, परंतु ‘मॅसेडोनिया’ या नावास ग्रीसमध्ये असलेल्या तीव्र विरोधामुळे मॅसेडोनियाचा या दोन्ही संघटनांमधील प्रवेश अडकून पडला आहे.या बाबतीत मॅसेडोनियाशी कोणताही तडजोड करण्यास ग्रीसच्या ७० टक्के नागरिकांचा विरोध आहे व याच मुद्द्यावर संसदेत मांडण्यात आलेल्या अविश्वास ठरावावरील मतदानात त्सिपरास यांचे सरकार शनिवारी थोडक्यात बचावले होते.
भांडण नको म्हणून देशाचे नावच बदलले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 3:57 AM