पश्चिमी आफ्रिकेमध्ये नायगरदेशात सत्तापालट झाले आहे. तेथील सैन्याने बंड करत देशाचे प्रमुख मोहम्मद बजौम यांची सत्ता उलथवली आहे. अचानक झालेल्या या घटनेने नायगरच्या आजुबाजुच्या छोट्या छोट्या देशांमध्ये सन्नाटा पसरला आहे. त्यांच्याही देशात असेच काही होण्याची भीती सर्वांना वाटू लागली आहे.
रातोरात सैन्याने सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेत राष्ट्रीय टेलिव्हीजनवर याची घोषणा करून टाकली आहे. जागोजागी सैन्याच्या गाड्या दिसत आहेत. नायगरमधील सर्व संस्था तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आल्या आहेत.
नायगरचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहम्मद बजौम यांना सत्तेवरून हटविण्यात आले आहे. सैन्याने बजौम यांना अटक केली आहे. या घटनेवर अमेरिकेकडून प्रतिक्रिया आली आहे. नायगरला मिळणारी मदत लोकशाही शासनावर अवलंबून असेल, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.
नायगरच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितले की, प्रेसिडेंशियल गार्डच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या विरोधात बंड करण्याचा प्रयत्न केला. मी मागे हटलो नाही तर लष्कर त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार आहे, असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रपतींचे गार्ड निदर्शनात सहभागी होते. इतर सुरक्षा दलांचा पाठिंबा मिळवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला, असे राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर असे म्हटले आहे.
राजधानी नियामी येथील अध्यक्षांच्या निवासस्थानी बजौम यांना अटक करायची होती. बुधवारी सकाळी राष्ट्रपती भवन आणि लगतची मंत्रालये लष्कराच्या वाहनांनी घेरण्यात आली होती. कर्मचारीही त्यांच्या कार्यालयात पोहोचू शकले नाहीत. लष्कराने बंड केल्याचे समजताच बजौम यांचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांनी निवासस्थानाची भिंत ओलांडण्याचा प्रयत्न केला, परंतू सैन्याने हवेत गोळीबार करत त्यांना पांगविले होते.