ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. 15 - एका महिलेनं आपल्या मुलीचं नाव सायनाईड (विष) असं ठेवण्याचा बेत आखला परंतु तिला तसं करण्यास न्यायालयानं बंदी घातल्याची घटना येथे घडली आहे. या महिलेला जुळी मुलं झाली. तिनं मुलाचं नाव प्रीचर ठेवलं आणि मुलीचं सायनाईड. सायनाईड हे किती गोड आणि छान नाव आहे, अशी तिची प्रतिक्रिया होती. हिटलरनं गोळी झाडून घेत आत्महत्या करण्यापूर्वी सायनाईड हे विष प्राशन केलं होतं.
ज्यावेळी परिसरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना असं नाव ठेवण्यात येत असल्याची कल्पना आली त्यावेळी त्यांनी कोर्टाला याची कल्पना दिली. अशी जगावेगळी नावं मुलांची ठेवली तर त्यांच्यावर दुष्परिणाम होतील असं सांगत कोर्टानं सायनाईड हे नाव ठेवण्यास मनाई केली.
या महिलेला याआधी मानसिक आजारानं ग्रासलं होतं, तसंच ती मद्यसेवनाच्या आहारीही गेली होती, असं कोर्टाच्या निदर्शनास यावेळी आणण्यात आलं.
या महिलेच्या वकिलांनी मुलांची नावं निवडण्याचा अधिकार महिलेचा असल्याचा युक्तिवाद केला. परंतु न्यायाधीशांनी अशा जालीम विषाचं नाव मुलीसाठी निवडणं कधीही मान्य होणार नाही असा निकाल दिला.
हिटलर आणि गोबेल्ससारख्यांचा सायनाईडनं घेतला, जी चांगली गोष्ट आहे, त्यामुळे मुलीचं नाव सायनाईड ठेवावं असंही या महिलेनं सांगून बघितलं.
परंतु, परिस्थितीनुसार आवडीनिवडी बदलतात, नावं बदलतात, फॅशन आणि विचार बदलतात, तरीही लहान मुलीचं असं नाव ठेवणं गैर असल्याचं मत न्यायाधीशांनी नोंदवलं आहे.