Omicron Variant: कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटनं संपूर्ण जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिअंट पहिल्यादा दक्षिण आफ्रिकेत आढळून आला होता. वायरोलॉजिस्ट वोल्फगँग प्रीझर यांनी सर्वात आधी ओमायक्रॉन व्हेरिअंटची ओळख पटवली होती. स्थानिक माध्यमांना मुलाखत देताना प्रोफेसर वोल्फगँग यांनी वाढत्या ओमायक्रॉनच्या रुग्णांबाबत धक्कादायक माहिती दिली आहे. येत्या काळात मोठ्या प्रमाणात ओमायक्रॉनची बाधा होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला आहे.
"नवा व्हेरिअंट खूप जास्त वेगानं पसरणारा आहे. या व्हेरिअंटची लागण होण्यापासून स्वत:चा बचाव करणं जवळपास अशक्यच आहे", असं विधान वोल्फगँग यांनी केलं आहे. याआधी दक्षिण आफ्रिकेत लवकरच ओमायक्रॉनचे रुग्ण कम होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार आता द.आफ्रिकेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसतही आहे. पण निष्काळजीपणा बाळगणं खूप धोकादायक ठरू शकतं असं वोल्फगँग यांचं म्हणणं आहे. "याआधीच्या व्हेरिअंटच्या तुलनेत ओमायक्रॉन जरी सौम्य स्वरुपाचा असला तरी आपल्याला या व्हेरिअंटची लागण झाल्यामुळे मृत्यू झाल्याची प्रकरणं देखील दिसत आहेत", असं वोल्फगँग म्हणाले.
ओमायक्रॉनपासून बचाव करणं कठीणओमायक्रॉनचा पहिला रुग्ण नोव्हेंबर महिन्यात आढळून आला होता. यानंतर संपूर्ण जगात दुप्पट वेगानं ओमायक्रॉनचा प्रसार होत असल्याचं दिसून आलं. सुरुवातीच्या माहितीनुसार इतर व्हेरिअंटच्या तुलनेत ओमायक्रॉन व्हेरिअंटचा प्रभाव कमी असला तरी त्याच्या प्रसाराचा वेग अधिक आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढीचा ताण प्रशासनावर पडू शकतो. "ओमायक्रॉन व्हेरिअंट साधा सर्दी-खोकला आणणारा व्हेरिअंट असल्याचं सिद्ध झालेलं नाही. पण चांगली गोष्ट अशी की त्याचा प्रवास त्याच दिशेनं होत आहे. वाईट गोष्ट अशी की या व्हेरिअंटपासून स्वत:चा बचाव करणं अशक्य आहे", असं वोल्फगँग म्हणाले.
"ओमायक्रॉन व्हेरिअंट किती वेगानं पसरतोय ते आपण पाहातच आहोत. यातील बहुतांश रुग्ण असिम्टमॅटिक स्वरुपाचे असले तरी पुढील काही महिन्यात जगातील बहुतांश लोकसंख्या ओमायक्रॉनच्या विखळ्यात सापडलेली असेल", असा सूचक इशारा वोल्फगँग यांनी दिला आहे.