अद्यापही कोरोना विषाणू जगभरात थैमान घालत आहे. अनेक देशांना कोरोनाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. अंदाज वर्तवण्यात येत असलेल्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून (Third wave of Coronavirus) मुलांचं संरक्षण करण्यासाठी ब्रिटनच्या सरकारनं (Britain Government) मोठी घोषणा केली आहे. यानुसार १२ ते १५ वयोगटातील मुलांना फायझरची कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जाणार आहे. फायझर बायोएनटेकची लस (Pfizer/BioNTech) या वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित असल्याचं चाचणीदरम्यान दिसून आल्यानं ब्रिटनच्या औषध नियामकानं शुक्रवारी मंजुरी दिली.
"आम्ही अतिशय सावधगिरी बाळगून १२ ते १५ वर्षे या वयोगटातील मुलांच्या वैद्यकीय चाचणीचा अभ्यास केला. त्यानंतर या वयोगटातील मुलांसाठी ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचं दिसू आलं. या लसीमुळे धोक्यापेक्षा अधिक फायदे आहेत," असं ब्रिटनच्या मेडिसिंस अँड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्लुलेटरी एजन्सीच्या प्रमुख जून रेन यांनी सांगितलं. यापूर्वी युरोपमध्येही १२ ते १५ या वयोगटातील मुलांना ही लस देण्यास मंजुरी दिली असल्याचंही त्यांनी सांगितलं. २८ मे रोजी युरोपियन मेडिसिन एजन्सीनं (EMA) यासंबंधी घोषणा केली होती.मुलांवर साईडइफेक्ट्स नाहीही लस दिल्यानंतर मुलांवर कोणत्याही प्रकारचे साईडइफेक्ट्स दिसले नाहीत असं युरोपियन महासंघाच्या औषध नियमाकाकडून सांगण्यात आलं. या लसीची योग्यरित्या पडताळणी करण्यात आली आहे. त्यानंतरच आम्ही या निर्णयावर पोहोचलो आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं. "लहान मुलांवर लस दिल्यानंतर कोणत्याही प्रकारचे गंभीर परिणाम दिसून आले नाहीत. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही," असं EMA चे लसीकरण रणनिती प्रमुख मार्को कावालेरी यांनी सांगितलं.